World Cup 2019 : ICC चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली सज्ज होत आहे. भारताच्या क्रिकेट संघाबाबत माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी एक विधान केले आहे. “विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दोन खेळाडू भारताच्या संघातील X-फॅक्टर आहेत. हे दोन खेळाडू भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देऊ शकतात”, असे मत होल्डिंग यांनी व्यक्त केले आहे.

“भारतीय संघ हा समतोल आहे. त्यांच्या संघात विराट कोहलीसारखा फलंदाज आणि जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज आहे. हे दोन खेळाडू भारताच्या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. या दोन खेळाडूंमध्ये भारताला विश्वचषक जिंकवून देण्यातही क्षमता आहे.”, असे होल्डिंग म्हणाले.

“यंदाचा विश्वचषक हा इंग्लडमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे यजमानांचे पारडे जड असू शकते. गेल्या काही काळात इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या संघात फलंदाज आणि गोलंदाज यांचा चांगला समतोल साधला गेला आहे. तसेच भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहेच. भारताची कामगिरी सातत्यपूर्ण आहेच. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे भारत किंवा इंग्लंड हे दोन संघ विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहेत असे मला वाटते, असे त्यांनी नमूद केले.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार<br />कुलदीप यादव<br />युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा