जागतिक रौप्यपदक विजेत्या अमित पंघाल (५२ किलो) याला अंतिम फेरीची लढत न खेळताच जर्मनीत सुरू असलेल्या कॉलोग्ने विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील रौप्यपदक विजेत्या सतीश कुमारने (+९१ किलो) दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अमितला जर्मनीच्या अर्गिश्ती टेर्टेरियानविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली. सतीशने फ्रान्सच्या डॅमिली डिनी मॉइन्झेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पण जर्मनीच्या नेल्व्ही टियाफॅकविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली.

महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकासाठी साक्षी आणि मनीषा या भारतीय खेळाडू भिडणार आहे. मनीषाने दोन वेळा जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरचा ५-० असा पराभव केला, तर साक्षीने जर्मनीच्या रामोना ग्राफला ४-१ असे पराभूत केले. आशियाई कांस्यपदक विजेत्या पूजा रायला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नेदरलँड्सच्या नॉचका फाँटिनने तिला पराभूत केले.

पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात मोहम्मद हसमुद्दीन व गौरव सोलंकीला कांस्यपदक मिळाले. हमसत श्ॉडालोव्हने हसमुद्दीनला व सॅम्युएल किस्तोहरीने सोलंकीला हरवले.