वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. पावसाची संततधार आणि मैदानातील ओलावा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही झाली नाही. या सामन्यासाठी आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. जर ४ दिवसात निकाल लागला नाही. तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होणार होता. मात्र पावसामुळे पंचांनी काही काळ वाट बघितली. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने आजच्या दिवशीचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊलमध्ये आतापर्यंत ६ कसोटी सामने झाले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ दोनदा सामना जिंकला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ एकदाच सामना जिंकला आहे.

एक्यू वेदरने दिलेल्या वृत्तानुसार पुढील २४ तास साऊदम्पटनमध्ये थांबून थांबून पाऊस पडणार आहे. तपमानाबद्दल बोलायचं झाल्यास साऊदम्पटनचं शुक्रवारचं सर्वाधिक तापमान हे १६ अंशांपर्यत तर किमान १२ अंशांपर्यत राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दिवसभर थंड वातावरण असेल. याच अल्हाददायक थंडीमध्ये साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊल मैदानात मंगळवारपर्यंत सामना खेळवला जाणार आहे. या पाच दिवसांदरम्यान सर्वाधिक तापमान हे १८ अंशांपर्यंत तर किमान ११ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाच दिवसांदरम्यान हवेतील आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत असेल.

यापूर्वी २०१९ विश्वचषकावेळी पावसाने हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे मॅनचेस्टरमध्ये उपांत्य फेरीचा सामना दोन दिवस चालला होता. त्यावेळेस भारताचा १८ धावांनी पराभव झाला होता. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.

दोन्ही संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.