भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याला यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा हा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे. गेल्या वर्षी बजरंगला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकलेले नव्हते. पण गेल्या वर्षभरात त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला यंदा सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. १२ सदस्यीय निवड समितीने त्याच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भुतिया, मेरी कोम यांसारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत.

१२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापडटूचे नाव सुचवू शकते. आजपासून खेलरत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कारासाठी निवड समिताची २ दिवसाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीअंती शनिवारी काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात अशी माहितीही सांगण्यात येत आहे. दिव्यांग भालाफेकपटू दीपा मलिक हिचेही नाव खेलरत्न पुरस्कारासाठी चर्चिले जात आहे.