उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये दोषी ठरविणे, हा माझ्या विरोधी कट असल्याचे मत  रिओ ऑलिम्पिकचा कोटा मिळवणाऱ्या नरसिंग यादवने म्हटले आहे. ‘नाडा’ अर्थात नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने बंदी घातलेल्या कोणत्याही द्रव्याचे सेवन केले नसल्याचा दावा नरसिंगने रविवारी केला. सोनिपतमधल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत ५ जुलै रोजी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये नरसिंग यादव ए, बी सॅम्पलमध्ये दोषी आढळला आहे. नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विश्वअजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्यानंतर भारतीय कुस्ती महामंडळाने महाराष्ट्राच्या नरसिंग यादवला ऑलिम्पिकचे तिकिट दिले होते. यापूर्वी कोणत्याही भारतीय कुस्तीपटूला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवून ऑलिम्पिकचा कोटा मिळवता आलेला नव्हता. भारताला कुस्तीमध्ये दोनदा ऑलिम्पिक पदके जिंकवून देणारा सुशील कुमारच्या जागी भारताकडून फ्रि स्टाइल कुस्ती या क्रीडा प्रकारात ७४ किलो वजनी गटामध्ये नरसिंग यादवची निवड झाली होती. ऑलिम्पिकची अंतिम यादी पाठवण्याची मुदत संपली असल्यामुळे त्याच्या जागी पुन्हा सुशील कुमारला संधी देणे, देखील अशक्य झाले आहे. त्यामुळे आता ७४ किलो वजनी गटात भारताच्या प्रतिनिधीत्वाला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे. नरसिंग हा सध्याच्या घडीला भारतातील सर्वोत्तम कुस्तीपटू असून त्याच्याकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची आशा होती.