भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने १० जून २०१९ ला आपल्या निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर त्याने IPLमधूनही काढता पाय घेतला आणि परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास सुरूवात केली. पण निवृत्तीनंतर जवळपास वर्षभरानंतर युवराजने BCCIवर टीका केली. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मला BCCIकडून हीन दर्जाची वागणून दिली गेली असा आरोप त्याने काही दिवसांपूर्वी केला. त्यावरून भारताचे माजी खेळाडू आणि निवड समिती सदस्य रॉजर बिन्नी यांनी आपली बाजू मांडली आहे.

युवराजने काय केले होते आरोप?

“एखाद्याला निरोप देणे कशा पद्धतीचे असावे याचा निर्णय खेळाडू करत नाही, BCCI करतं. मलादेखील निरोपाचा सामना खेळवणं हे BCCI च्या हातात होतं. पण माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मला BCCIने फार वाईट वागणूक दिली. या यादीत मी एकटाच नाही. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, जहीर खान यांच्याबाबतीतही फार काही वेगळं घडलं नाही. या साऱ्या दिग्गज खेळाडूंना BCCIने वाईट प्रकारे वागणूक देऊन त्यांचा अपमानच केला. पण भारतीय क्रिकेटमध्ये हे सवयीचं झालं आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत जेव्हा हे घडलं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं नाही”, असं वक्तव्य युवराजने केलं.

काय म्हणाले रॉजर बिन्नी?

रॉजर बिन्नी हे २०१२ ते २०१५ या कालावधीत निवड समिती सदस्य होते. त्यांनी युवराजच्या या आरोपानंतर आपली बाजू मांडली. “कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात खेळाडू अपेक्षेइतका तंदुरूस्त राहत नाही. सुरूवातीची चपळाई ही कारकिर्दीच्या अखेरीस काहीशी कमी होते. तुमच्या तंदुरूस्तीचा स्तरही हळूहळू खालावतो. त्यामुळे आधी केलेल्या कामगिरीला साजेशी कामगिरी करणं खूप कठीण ठरतं. युवराजला कदाचित वाटलं असेल की त्याने अजून क्रिकेट खेळायला हवं होतं. तो अप्रतिम क्रिकेटपटू होता यात वादच नाही. त्याची फटकेबाजीची प्रतिभा अतुलनीय होती. म्हणूनच त्याची कारकिर्द उल्लेखनीय होती. पण मला असं वाटतं की त्याला संघाबाहेर करण्यात आलं आणि काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली, ती वेळ योग्यच होती”, असे बिन्नी यांनी एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.