वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. स्टोक्सच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताना स्टोक्सने दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात दीडशतक (१७६) तर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक (७८) ठोकले. दोन्ही डाव मिळून त्याने ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याची स्तुती केली. “जर टीम इंडियाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो”, अशा शब्दात पठाणने त्याची स्तुती केली. तसेच मॅचविनर असा हॅशटगही स्टोक्ससाठी वापरला.

यानंतर युवराज आणि इरफान यांच्यात ट्विटरवर मजेशीर संवाद रंगला. युवराजने इरफानला विचारलं, ‘तुला काय वाटतं की आपल्या संघाकडे असे अष्टपैलू खेळाडू नाहीत जे सामना जिंकवून देऊ शकतील.’ त्यावर इरफान पठाण म्हणाला, ‘युवराज सिंग (तर) अधिकृतरित्या निवृत्त झाला आहे ना…’ या कमेंटवर युवराजने पुन्हा रिप्लाय केला, ‘मला वाटलंच होतं की हे सगळं माझ्यावर येणार. तसं बघितलं तर तुम्ही पण काही कमी (प्रतिभावान) नव्हतात.’ यावर इरफानने ‘तू तर मला चांगलाच ओळखतोस’, असा रिप्लाय देत ठोसा मारण्याचा इमोजी वापरला.

वाचा तो संवाद-

दरम्यान, ३ सामन्यांच्या मालिकेत बेन स्टोक्स २ सामन्यांनंतर ३४३ धावांसह सर्वाधिक धावांचा मानकरी आहे. त्याने पहिल्या कसोटीतदेखील ४३ आणि ४६ धावा केल्या होत्या. ५८९ चेंडूचा सामना करत स्टोक्स आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक चेंडूचा सामना करणारा फलंदाज ठरलाय. तसेच ५ षटकार लगावत सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा मानही स्टोक्सलाच मिळाला आहे.