टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने आज आपल्या वयाच्या ३३ व्या वर्षात पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांमध्ये रोहितने स्वतःच्या फलंदाजीत केलेला बदल आणि भारतीय संघात आपलं पक्क केलेलं स्थान हा प्रवास वाखणण्याजोगा आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘रो-हिट’ किंवा ‘हिटमॅन’ या नावाने ओळखला जातो. मात्र याव्यतिरीक्त रोहित आणखी एका टोपणनावाने ओळखला जातो. संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने याबद्दल खुलासा केला आहे.

युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी Cricbuzz संकेतस्थळाला एक मुलाखत दिली होती. यादरम्यान, रोहितचे जवळचे सहकारी त्याला रोहिता या नावानेही हाक मारतात असं चहलने सांगितलं. रोहिता हे नाव रोहितला कसं पडलं यापाठीमागची कहाणीही चहलने सांगितली. भारतीय संघातील एका सिनीअर खेळाडूच्या फोनबुकमध्ये रोहित शर्माचं नाव रोहिता या नावाने सेव्ह केलं आहे. खुद्द रोहितनेच ही गोष्ट मला सांगितली, यानंतर मी देखील त्याला रोहिता या नावाने हाक मारतो असं चहलने सांगितलं.

bcc.tv च्या Chahal TV या कार्यक्रमात युजवेंद्र चहल आपल्या खास शैलीत सर्वांची मुलाखत घेत असतो. यामध्ये अनेकदा रोहित शर्मा चहलची फिरकी घेताना आपण पाहिलं आहे. याव्यतिरीक्त सोशल मीडियावरही दोघांमध्ये थट्टा-मस्करी सुरु असते. चहलने आतापर्यंत ४२ टी-२० आणि ५२ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

अवश्य वाचा – HBD Rohit : ‘हिटमॅन’चे हे ५ विक्रम मोडणं सध्यातरी अशक्यच