पाच वेळा विश्वविजेता ठरलेला विश्वनाथन आनंद अजूनही फॉर्मसाठी धडपडत आहे. जलद बुद्धिबळ या आपल्या आवडत्या प्रकारात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आनंदला झुरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
क्लासिकल प्रकाराच्या पाच डावांनंतर चार गुणांसह चौथ्या स्थानी असलेल्या आनंदला जलद प्रकारात पाच डावांत फक्त एका गुणाची कमाई करता आली. दहा डावांत आनंदने पाच गुण मिळवत सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत पाचवे स्थान प्राप्त केले. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचे या स्पर्धेतील जेतेपद धोक्यात आले होते. पण जलद प्रकारात दोन गुण मिळवत कार्लसनने १० गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. कार्लसनने इटलीच्या फॅबिआनो कारुआना याला एका गुणाने मागे टाकत वर्चस्व गाजवले. कारुआना आणि अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियान यांनी नऊ गुणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याने समाधानकारक कामगिरी करत ७.५ गुणांसह चौथा क्रमांक पटकावला. इस्रायलच्या बोरिस गेल्फंडला ४.५ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
क्लासिकल प्रकारात पहिले दोन पराभव पत्करूनही आनंदची त्या तुलनेत जलद प्रकारात कामगिरी सुमार झाली. जलद प्रकारात आनंदला अरोनियन, नाकामुरा आणि कारुआनाविरुद्ध झालेल्या पहिल्या तिन्ही लढतीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर गेल्फंड आणि कार्लसनविरुद्ध झालेल्या अखेरच्या दोन डावांत आनंदने बरोबरी पत्करत एक गुण मिळवला. कार्लसनविरुद्धचा आनंदचा डाव २०व्या चालीपर्यंत चांगलाच रंगला होता. अखेर कार्लसनने डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.