आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. मे आणि जून २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नाव म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर इतर देशांचे स्टार खेळाडू देखील या यादीत सामील झाले आहेत. निवृत्तीच्या या लाटेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
मे २०२५ भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आणि भावुक करणारा ठरला. ७ मे २०२५ ला रोहित शर्माने संध्याकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर फक्त पाच दिवसांनी, १२ मे २०२५ रोजी, विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या दोन्ही क्रिकेटपटूंच्या कसोटी निवृत्तीनंतर एका पर्वाचा अंत झाला.
रोहित आणि विराटने भारतीय क्रिकेटला नवीन स्तरावर नेऊन ठेवले आणि त्यांच्या निवृत्तीमुळे संघात तरुण नेतृत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोहली आणि रोहितच्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्यचकित झाले. यासह भारतीय संघाची धुरा आता युवा खेळाडूंच्या हातात असणार आहे.
२३ मे २०२५ ला श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू एंजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मॅथ्यूजने बराच काळ खेळताना संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्याची निवृत्ती श्रीलंकेच्या क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने २ जून २०२५ला एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन संघासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले. पण मॅक्सवेल टी-२० स्वरूपात खेळताना दिसणार आहे.
यानंतर दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने वयाच्या ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता तो आफ्रिकेकडून व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार नाही. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरनने वयाच्या २९व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीचा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक होता.
हेनरिक क्लासेन आणि निकोलस पुरन यांनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी ते जगभरातील विविध फ्रँचायझी लीग क्रिकेट खेळणार आहेत. सध्या जगभरात लीग क्रिकेटचं प्रस्थ वाढलं आहे. यामधील जवळपास अनेक लीगमध्ये पुरन आणि क्लासेन खेळताना दिसतात. दोघेही आपल्या विस्फोटक खेळीसाठी ओळखले जातात, दोघांनी अनेकदा एकहाती संघांना विजय मिळवून दिले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा लीग क्रिकेटला महत्त्व देताना दिसत आहेत.
राष्ट्रीय बोर्डाशी करारबद्ध झाल्यास त्या संघाच्या वर्षभरातील टेस्ट, वनडे आणि टी२० मालिकांसाठी तय्यार राहावं लागतं. मात्र फ्रीलान्स तत्वावर खेळायचं ठरवल्यास अवघे काही महिने खेळून वर्षभराचा पैसा मिळतो. पूरन आणि क्लासन दोघेही जगभरात सुरु असलेल्या विविध लीगचा भाग आहेत.