विजय हजारे करंडक स्पर्धेतील तामिळनाडू विरूद्ध कर्नाटक या संघांमधील अंतिम सामन्यात कर्नाटकच्या अभिमन्यू मिथून याने हॅटट्रिक घेतली. तामिळनाडूच्या संघाचे शेवटचे तीन गडी बाद करत त्याने आपल्या विजय हजारे स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली. त्याने ९.५ षटकांत ३४ धावा देऊन ५ गडी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे आजच अभिमन्यू मिथून याचा वाढदिवस असून त्याने त्याच दिवशी स्वत:ला हे सुंदर गिफ्ट दिल्याचे नेटकऱ्यांकडून बोलले जात आहे.

अभिमन्यू मिथूनने हॅटट्रिक घेत विक्रमांचा ‘डबल धमाका’ केला. अभिमन्यू मिथून हा विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. या आधी कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. अभिमन्यू मिथूनने मात्र ते करून दाखवलं. याशिवाय कर्नाटकच्या संघाकडून हॅटट्रिक घेणारादेखील अभिमन्यू मिथून हा पहिलाच खेळाडू ठरला.

अभिमन्यू मिथून याने आणखी एक पराक्रमदेखील केला. रणजी करंडक स्पर्धा आणि विजय हजारे ट्रॉफी या दोनही स्पर्धांमध्ये हॅटट्रिक घेणारा अभिमन्यू मिथून हा दुसरा गोलंदाज ठरला. या आधी मुरली कार्तिक याने हा पराक्रम केला होता.