Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याला अलिकडेच भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवत शुबमन गिलची त्याच्या जागी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रोहित-विराट २०२७चा वनडे विश्वचषक खेळणार की नाही यावरून चर्चा सुरू आहेत. पण यादरम्यान रोहित मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीत व्यस्त आहे. यासाठी तो अभिषेक नायरसह शिवाजी पार्कमध्ये सरावासाठी गेला होता, तेथील नायरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रोहित मुंबईत सातत्याने सराव करताना दिसत आहे. रोहित १० ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात सरावासाठी पोहोचला होता. यादरम्यान त्याच्याबरोबर त्याचा खास मित्र आणि माजी क्रिकेटपटू व कोच अभिषेक नायर होता. त्याचबरोबर अंगक्रिश रघुवंशी हा युवा क्रिकेटपटू होता. रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांनी शिवाजी पार्क मैदानाबाहेर मोठी गर्दी केली होती.
शिवाजी पार्क मैदानावर रोहितने सरावादरम्यान बराच वेळ नेटमध्ये फलंदाजी केली. माजी भारतीय कर्णधार शिवाजी पार्कवर आल्याचे कळताच, शेकडो चाहते त्याला पाहण्यासाठी मैदानावर गर्दी करू लागले. रोहितने या सरावादरम्यान कमालीचे स्वीप आणि पूल शॉट्स लगावले. रोहितच्या प्रत्येक शॉटवर चाहते त्याला दाद देत होते.
चाहत्यांनी रोहित शर्माला पाहण्यासाठी इतकी गर्दी केली होती की रोहितला मैदानाच्या बाहेर येणं देखील शक्य होतं नव्हतं. रोहित आपला सराव संपवून शिवाजी पार्क मैदानाबाहेर जात असताना चाहत्यांच्या मोठ्या गर्दीने गेटबाहेरचा रस्ता पूर्णपणे रोखला. चाहत्यांना त्यांच्या स्टारची आणखी एक झलक पाहायची होती, चाहत्यांनी ऑटोग्राफ आणि फोटोसाठीही खूप गर्दी केली होती.
“प्लीज त्याला धक्का देऊ नका, लागलं नाही पाहिजे”, अभिषेक नायरने रोहितसाठी चाहत्यांनी केली विनंती
चाहत्यांच्या गर्दीमुळे रोहित बराच वेळ बाहेर येऊ शकला नाही आणि अशा वेळी, त्याच्याबरोबर असलेला त्याचा जवळचा मित्र आणि टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अभिषेक नायरला परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी बाहेर यावं लागलं. अभिषेक नायर बाहेर आला आणि म्हणाला, “आपण सर्व जण त्याचे चाहते आहोत, त्याला प्लीज कोणीही धक्का देऊ नका. त्याला बिलकुल लागलं नाही पाहिजे. सगळे जण थोडे मागे व्हा. प्लीज सगळे लांब राहा.” अभिषेकचं म्हणणं ऐकून चाहते थोडे मागे सरकले.
अभिषेक नायर चाहत्यांना रोहितला बाहेर पडू देण्याचे आवाहन करत राहिला. जे यशस्वी झालं आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर, रोहित शर्मा मैदानातून बाहेर पडला. पण रोहित बाहेर येताच चाहत्यांनी एकाच आवाज केला आणि फोटो घेण्यासाठी गर्दी केली. पण रोहित कसाबसा त्याच्या कारपर्यंत पोहोचला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सर्वच जण अभिषेक नायरचं कौतुक करत आहेत.