ICC T20I Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( आयसीसी) बुधवारी टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. अभिषेकने आपला सनरायझर्स हैदराबाद संघातील सहफलंदाज ट्रॅव्हिस हेडला मागे सोडत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर १ फलंदाज बनण्याची किमया साधली आहे. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठणारा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना हा पराक्रम करता आला आहे.

ही क्रमवारी जाहीर करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅ्व्हिस हेड अव्वल स्थानी होता. आता अभिषेक शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेटींग ही ८२९ वर जाऊन पोहोचली आहे. तर ८१५ रेटींग पॉईंट्ससह ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानी घसरला आहे. ८०४ रेटींग पॉईंट्ससह तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी कायम आहे. काही महिन्यांपूर्वी अव्वल स्थानी असलेला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ७३९ रेटींग पॉईंट्ससह सहाव्या स्थानी कायम आहे. टी-२० क्रिकेटमधील १० अग्रगण्य खेळाडूंच्या यादीत ३ भारतीयांचा समावेश आहे.

अभिषेक शर्माची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी

अभिषेक शर्माला ६ जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.या मालिकेत त्याने दमदार शतकी खेळी केली होती. त्याला आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत १७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ३३.४३ च्या सरासरीने ५३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावे २ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. तर १३५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर त्याने भारतीय टी-२० संघात सलामीवीर फलंदाज म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे.

कसोटी रँकिंगमध्ये ऋषभ पंतचा बोलबाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसीकडून कसोटी फलंदाजांची क्रमवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. यासह तर सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल या यादीत आठव्या स्थानी घसरला आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये दमदार फलंदाजी करत असलेला कर्णधार शुबमन गिल गुणतालिकेत ९ व्या स्थानी कायम आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानी कायम आहे.