Asia Cup 2025 Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माने आशिया चषकात पाकिस्तानविरूद्ध दोन्ही सामन्यात मोठे फटके खेळत सामन्याला सुरूवात केली. गट टप्प्यातील सामन्यात त्याने शाहीन आफ्रिदीविरूद्ध चौकार खेचला होता, तर सुपर फोरमधी सामन्यात त्याने षटकाराने सामन्याला सुरूवात केली. यादरम्यान त्याने विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
सलामीवीर अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि गगनचुंबी षटकारांसाठी ओळखला जातो. प्रत्येक सामन्यात तो याचा प्रत्यय देताना आपल्याला दिसतो. पाकिस्तानविरूद्ध सामन्यात सामनावीर ठरलेल्या अभिषेक शर्माने या सामन्यात ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. तर त्याने गिलसह पाकिस्तानविरूद्ध पहिल्या विकेटसाठी १०० अधिक धावांची भागीदारी केली.
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार अर्धशतक झळकावत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. भारताच्या या डावखुऱ्या फलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत पन्नास षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमासह त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसह अनेक फलंदाजांना मागे टाकलं आहे.
अभिषेक शर्माने केवळ २४ चेंडूत षटकार आणि चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. त्याने या ४ षटकार खेचले. दुसऱ्या षटकारासह, त्याने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी चेंडूंत पन्नास षटकार मारण्याचा विक्रम केला. अभिषेकने फक्त ३३१ चेंडूत पन्नास टी-२० षटकार लगावले आहेत. यापूर्वी हा विक्रम एविन लुईसच्या नावावर होता, ज्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ३६६ चेंडूत हा पराक्रम केला होता.
टी-२० मध्ये सर्वात कमी चेंडूंत षटकार लगावणारे फलंदाज (फुल मेंबर नेशन)
३३१ – अभिषेक शर्मा
३६६ – एर्विन लुईस
४०९ – आंद्रे रसेल
४९२ – हजरतुल्ला झाझाई
५१० – सूर्यकुमार यादव</p>
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानविरुद्ध एकत्र विक्रमही रचला. अभिषेक आणि गिल यांनी १०५ धावांची भागीदारी केली. दोघांनी फक्त ५९ चेंडूत ही भागीदारी रचली. ही भारताची पहिली शतकी भागीदारी आहे आणि पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च भागीदारी आहे. या भागीदारीत शुबमन गिल अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि तो ४७ धावांवर बाद झाला. पण गिल आणि शर्मा यांनी मिळून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला.
अभिषेक आणि शुबमन गिल दोघेही पंजाबकडून क्रिकेट खेळतात. हे दोघेही एकमेकांचे चांगले आणि घट्ट मित्र असून शालेय वयापासून ते एकत्र क्रिकेट खेळत आले आहेत. याशिवाय या दोघांनीही अष्टपैलू युवराज सिंगकडून क्रिकेटचं मार्गदर्शन घेतलं आहे.