Abhishek Sharma- Yuvraj Singh Dance: भारतीय टी-२० संघातील स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि युवराज सिंग यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्माचा प्री वेडिंगचा कार्यक्रम पार पडला. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांची धुलाई करणारा अभिषेक शर्मा सिक्सर किंग युवराज सिंगसोबत डान्स करताना दिसून आला आहे. दोघांनी गायक रंजीत बावासोबत मिळून भांगडा केला.

अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्माचा विवाह सोहळा येत्या ३ ऑक्टोबरला पार पडणार आहे. विवाह सोहळ्याआधी १ ऑक्टोबरला प्री वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आशिया चषक गाजवून आलेल्या अभिषेक शर्माच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रसिद्ध गायक रंजीत बावा या कार्यक्रमात लाईव्ह म्युझिक देताना दिसून येत आहे.

दुबईत आशिया चषक २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा पहिल्यांदाच खेळत असलेल्या अभिषेक शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत, या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याचा पराक्रम केला. या कामगिरीच्या बळावर त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ३१४ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ७४, बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात ७५ आणि श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६१ धावांची खेळी केली. त्याने या स्पर्धेत फलंदाजी करताना ४४.८५ च्या सरासरीने आणि २०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

अभिषेक शर्मा हा आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएल स्पर्धेत खेळताना त्याने ७७ डावात १७१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करतो. २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या टी -२० मालिकेतून त्याने आपल्या टी-२० क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली होती. या मालिकेत त्याने आपलं पहिलं शतक झळकावलं होतं. आतापर्यंत त्याला २४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १३५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ८४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत.