Basketball League In India: भारतात आतापर्यंत सर्वच खेळांच्या व्यावसायिक लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. आयपीएल सुरू झाल्यानंतर, प्रो कबड्डी, इंडियन सुपर लीग, खो–खो लीग आणि टेबल टेनिस लीग अशा अनेक स्पर्धा सुरू झाल्या. आता खेळाडूंना आणखी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. एसीजी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने मिळून व्यावसायिक बास्केटबॉल लीग सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या लीग स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी देखील असणार आहे.
या लीग स्पर्धेला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल लीग (एनबीएल) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त (कमिशनर) जेरेमी लोएलिगर यांची एसीजी स्पोर्ट्सचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नवीन भूमिकेत, लोएलिगर लीगच्या ब्लूप्रिंटच्या विकासाचे नेतृत्व करतील.
“बास्केटबॉल केवळ एक खेळ नसून नेतृत्व आणि संधी निर्माण करण्याचे एक साधन आहे,” असे एसीजीचे व्यवस्थापकीय संचालक करण सिंग म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले , “तळागाळातील उपक्रमांपासून सुरू होणारा आमचा दशकभराचा प्रवास, तरुण खेळाडूंना पुढील भविष्यासाठी संधी निर्माण करून देणार आहे.”
या उपक्रमात एसीजीची नेतृत्वाची भूमिका लीग ऑपरेशन्सच्या पलीकडे जाते. त्यांच्या दीर्घकालीन धोरणाचा एक भाग म्हणून, एसीजी वर्षभरात भारतातील पहिले पूर्णपणे निवासी उच्च-कार्यक्षमता केंद्र सुरू करेल. अकादमीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम प्रतिभावंत प्रशिक्षकांना निमंत्रित केले जाईल. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांसाठी व्यापक स्वरूपात प्रशिक्षण दिले जाईल. पोषण, मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक संतुलन हे अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असतील. भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंचा विकास सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याआधी भारतात बास्केटबॉल लीग स्पर्धा खेळवली गेलेली नाही. हा जगातील दुसरा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. पण, भारतात या खेळाला हवं तितकं प्रोत्साहन मिळत नाही. या लीग स्पर्धेमुळे, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच हा खेळ येत्या १० ते १५ वर्षांत क्रिकेटला मागे सोडून पुढे जाईल, असं आयोजकांनी म्हटलं आहे.