आयपीएल २०२५ चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. आरसीबीने १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या जेतेपदानंतर संघाची किंमत अधिक वाढली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी आरसीबीचा संघ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा रिपोर्ट समोर आला होता. यादरम्यान आता भारतातील उद्योजक हा संघ खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, ब्रिटीश स्पिरिट्स कंपनी डियाजियो पीएलसीने आरसीबी संघ विकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न असा आहे की, आरसीबीची किंमत किती असेल आणि ते खरेदी करण्यात कोणाला रस असेल? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आता समोर येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबीची किंमत २ बिलियन म्हणजेच जवळपास १७ हजार कोटींच्या घरात आहे. ही रक्कम आश्चर्यकारक तर आहेच पण यापेक्षा मोठी गोष्टी म्हणजे इतक्या मोठ्या किमतीत आरसीबीला खरेदी करण्यास भारतातील उद्योजकाने तयारी दाखवली आहे.

सीएनबीसी-टीव्ही१८ च्या वृत्तानुसार, आदर पूनावाला यांना आरसीबी खरेदी करण्यात रस आहे. पूनावला एकटेच आरसीबी खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. पण, त्यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

RCB संघ डियाजियो कंपनीला का विकायचा आहे?

डियाजियो इंडियाचे एमडी आणि सीईओ प्रवीण सोमेश्वर यांनी सीएनबीसी-टीव्ही१८ ला संघ विकण्यामागचं कारण सांगितलं. डियाजियोला RCB संघ विकायचा आहे कारण त्यांच्यामते हा त्यांचा मुख्य व्यवसाय नाहीये.

आरसीबी संघ जर आदर पुनावाला यांनी खरेदी केला तर आयपीएलमधील आणखी एक मोठा फ्रँचायझी करार आपल्याला पाहायला मिळणार आहे. टोरेंट ग्रुपने टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून अलीकडेच सीव्हीसी कॅपिटलच्या सल्लागार निधीद्वारे पूर्णपणे मालकीची असलेली आयरेलिया कंपनी प्रा. लि. कडून गुजरात टायटन्स संघामधील ६७% बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी एक निश्चित करार केला आहे.

त्या करारामध्ये जीटीचे मूल्य सुमारे ७,५०० कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे, आयरेलिया ३३% अल्पसंख्य हिस्सा राखून ठेवेल. हा व्यवहार बीसीसीआयच्या मंजुरींसह इतर मान्यतेनुसार केला जाईल.

कोण आहेत आदर पुनावाला?

आदर पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीने कोरोनोच्या काळात कोविशिल्ड लस तयार केली होती. पूनावाला हे एका पारशी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये एसआयआयची स्थापना करण्यापूर्वी घोडे व्यापारातून आपले नशीब कमावले होते. गेल्या वर्षी लंडनमध्ये १४४६ कोटी रुपयांचे घर खरेदी केल्यानंतर आदर पूनावाला प्रसिद्धीच्या झोतात आला.