एपी, मँचेस्टर
तारांकित आघाडीपटू आणि फुटबॉलचे भविष्य म्हणून पाहिले जाणारा किलियन एम्बापे फ्रेंच फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेनला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. एम्बापेचा सेंट-जर्मेनसोबतचा करार आगामी हंगामाअंती संपुष्टात येणार आहे. त्यानंतर हा करार आणखी एका वर्षांने वाढवण्याची एम्बापेकडे मुभा आहे. मात्र, आपण तसे करणार नसल्याचे एम्बापेने सेंट-जर्मेनला कळवले आहे. त्यामुळे आता लिओनेल मेसीपाठोपाठ एम्बापेही सेंट-जर्मेन क्लब सोडण्याची शक्यता बळावली आहे.
२४ वर्षीय एम्बापेने सेंट-जर्मेनच्या व्यवस्थापनाला सोमवारी पत्र पाठवून आपला निर्णय कळवला. आगामी हंगामाअंती करार संपुष्टात आल्यानंतर एम्बापे आपल्या पसंतीच्या संघाशी करारबद्ध होऊ शकेल. तसे झाल्यास सेंट-जर्मेनला काहीच मोबदला मिळणार नाही. त्यामुळे सेंट-जर्मेनने आता एम्बापेची विक्री करण्याचा विचार सुरू केला आहे.
गेल्या काही काळापासून स्पेनमधील बलाढय़ क्लब रेयाल माद्रिद एम्बापेला खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच करीम बेन्झिमाने काही दिवसांपूर्वीच रेयाल माद्रिद सोडून सौदी अरेबियातील क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याची जागा घेण्यासाठी रेयालकडून विविध नामांकित आघाडीपटूंचा विचार केला जात आहे. यात एम्बापेचे नाव आघाडीवर आहे. रेयालने २०२१मध्ये एम्बापेला आपल्या संघात दाखल करून घेण्यासाठी सेंट-जर्मेनला १९० मिलियन डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सेंट-जर्मेनने एम्बापेला आपल्याकडेच राखण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच्याशी नव्याने करारही केला. परंतु आता एम्बापेनेच सेंट-जर्मेन क्लब सोडण्याची तयारी दर्शवली आहे. एम्बापेकडे आपला करार एका वर्षांने वाढवण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा वेळ होता. मात्र, त्याने करार वाढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक
मेसीने सेंट-जर्मेनसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर अमेरिकेतील इंटर मियामी संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मेसी पुन्हा नव्याने करार करणार नाही, हे अपेक्षितच होते. मात्र, एम्बापेचा निर्णय हा सेंट-जर्मेनसाठी मोठा धक्का आहे. एम्बापेची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. तसेच तो फ्रान्सचा सर्वात नामांकित खेळाडू आहे.
२०१७ सालापासून सेंट-जर्मेनचे प्रतिनिधित्व करताना एम्बापेने सर्व स्पर्धात मिळून २६० सामन्यांत २१२ गोल केले आहेत.