India reached 2nd position in the WTC rankings : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला आहे. राजकोटमध्ये त्यांनी पाहुण्या संघाचा ४३४ धावांनी पराभव केला. कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०२१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला होता. या मोठ्या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.
इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून ५० गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी ५९.५२ वर पोहोचली आहे. भारताने ५५ टक्के गुण मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम –
दक्षिण आफ्रिकेवरील दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर न्यूझीलंड संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी ७५.०० आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात पराभव झाला आहे. २०२३-२५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाने १० कसोटी सामने खेळले आहेत आणि सहा जिंकले आहेत. कांगारूंना तीनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने सात कसोटी सामने खेळले असून चार जिंकले आहेत. टीम इंडियाने दोन सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वाल ‘दादा’वरही पडला भारी! गांगुलीचा मोडला १७ वर्षांपूर्वीचा विक्रम
कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात मोठा विजय –
तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे, तर भारताने इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला आहे. राजकोटमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२२ धावांवर गारद झाला. मार्क वुड वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला २० घावांचा आकडाही गाठता आला नाही. वुडने १५ चेंडूत ३३ धावा केल्या.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : भारत ‘यशस्वी’, बॅझबॉल तंत्रासह दणदणीत विजय
त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी मिळाले. बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली.