Ajinkya Rahane: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा संघ २-१ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत विजयाची नोंद केली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुन्हा एकदा सामना जिंकून भारतीय संघावर २-१ ने आघाडी घेतली. त्यामुळे चौथा कसोटी सामना हा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेने प्लेइंग ११ मध्ये कोणत्या ११ खेळाडूंना संधी द्यावी? याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा चौथा कसोटी सामना हा २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याआधी अजिंक्य रहाणेने भारतीय संघाला अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. भारतीय संघाने या मालिकेत अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्यावर अधिक भर दिला आहे. पहिल्या कसोटी रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरची जोडी होती. या सामन्यात शार्दुल फ्लॉप राहिला. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या तिघांना संधी दिली गेली.
मात्र, अष्टपैलू खेळाडूसह प्रमुख गोलंदाज संघात असणंही महत्वाचं असल्याचं अजिंक्य रहाणेने सांगितलं आहे. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने गेल्या दोन सामन्यात लागोपाठ ४ अर्धशतकं झळकावली आहेत. वॉशिंग्टन सुंदरनेही फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. मात्र, रवींद्र जडेजाला गोलंदाजीत आपली छाप सोडता आलेली नाही. तो फलंदाजी करतोय पण गोलंदाजीचं काय? अजिंक्य रहाणेने सामना जिंकण्यासाठी २० गडी बाद करण्यावर अधिक भर दिला.
अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “ कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या आणि पाचव्या दिवशी फलंदाजी करणं कठीण असतं हे सर्वांना माहीत आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत दमदार गोलंदाजी केली. मला तरी हेच वाटतं की, भारतीय संघाकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. ही संधी भारताने गमावली. भारताने चौथ्या कसोटीत आणखी एक गोलंदाजाला संघात स्थान द्यावं. कारण २० गडी बाद करून सामना जिंकता येऊ शकतो.”
चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र, हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसू शकतो. आता रहाणेचा सल्ला ऐकून भारतीय संघ अतिरिक्त गोलंदाजाला संधी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.