Ajinkya Rahane On His Early Days In Cricket: मला भारतीय संघासाठी पु्न्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळायचं आहे, अशी इच्छा भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने व्यक्त केली आहे. अजिंक्य रहाणे २०२३ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आलेलं नाही. सध्या तो इंग्लंडमध्ये आहे. त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. दरम्यान आथर्टन आणि नासीर हुसेन यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने डोंबिवलीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे हा मुळचा डोंबिवलीचा आहे. त्याची क्रिकेट कारकिर्द इथूनच सुरू झाली. आता लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर बसून त्याने डोंबिवलीतील क्रिकेटच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
लॉर्ड्स कसोटीतील तिसऱ्या दिवशी पहिले सत्र संपल्यानंतर मायकल आथर्टन आणि नासीर हुसेन यांनी अजिंक्य रहाणेची मुलाखत घेतली. यादरम्यान आथर्टनने अजिंक्य रहाणेला विचारलं, ” तुझ्या घरात कुणीही क्रिकेट खेळत नव्हतं, तरीही तुझं क्रिकेटवर इतकं प्रेम कसं आणि हे कुठून निर्माण झालं?” या प्रश्नाचं उत्तर देताना अजिंक्य रहाणे म्हणाला, ” माझा जन्म अहमदनगरध्ये झाला जे मुंबईपासून ५ तासांवर आहे. माझे वडील मुंबईत कार्यरत होते, त्यामुळे मी १० दिवसांचा असताना आम्ही मुंबईत आलो. आम्ही मुंबईत डोंबिवलीमध्ये राहत होतो, जे मुंबईपासून २ तासांवर आहे. माझ्यासाठी सगळं काही तिथूनच सुरू झालं – मी माझ्या मित्रांसोबत बॅकयार्डमध्ये खेळायचो, आणि तिथूनच माझं क्रिकेटवर प्रेम निर्माण झालं. दररोज मी बॅट घेऊन टेनिस बॉलने खेळायला जात असे. खेळाचा आनंद घेत-घेत मी त्यात रमलो. आमच्या कुटुंबात कोणताही खेळाचा वारसा नव्हता. त्यामुळे हे सगळं शुद्ध क्रिकेटप्रेमातून आलेलं आहे. मुंबई क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर मी डोंबिवलीहून सीएसएमटीपर्यंत दोन तास प्रवास करत असे – किटबॅग घेऊन, फक्त क्रिकेटसाठी.”
अजिंक्य रहाणेने भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला,” मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. सध्या मी माझा खेळ एन्जॉय करतोय. फिट राहण्यासाठी मी माझा ट्रेनर आणि ट्रेनिंगचे कपडे सोबत घेऊन आलो आहे. देशांतर्गत स्पर्धांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे मला तयारी करायची आहे.”