Rohit Sharma Virat Kohli ODI Future: रोहित शर्मा विराट कोहली यांनी कसोटी व टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय क्रिकेट संक्रमणातून जात आहे. दरम्यान भविष्याचा विचार करता अनेक मोठे निर्णयही घेतले जात आहेत. त्याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरूद्द मालिकेसाठी वनडे संघाच्या नेतृत्त्वबदलातून समोर आला. रोहितच्या जागी आता गिल वनडे संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. यादरम्यान रोहित-विराटच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत निर्णय मात्र आता त्या दोघांच्या हातात नसेल.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ निवड समितीने भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करता निर्णायक आणि कठोर निर्णय घेतले आहेत. त्यातील ताजा निर्णय म्हणजे कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, ज्यामुळे रोहित शर्माला या भूमिकेतून बाजूला करण्यात आलं आहे.
वनडे संघातील नेतृत्त्वबदलाचा हा निर्णय कधी ना कधी होणार होताच, पण तो इतक्या लवकर घेतला जाईल; याची कल्पना नव्हती. पुढील एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये खेळवला जाणार असून, त्यासाठीचा कालावधी खूप मोठा आहे. त्यामुळे सध्या ३८ वर्षीय रोहित शर्मा याच्यावर दीर्घकालीन जबाबदारी सोपवणं शक्य नव्हतं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी भारतीय क्रिकेटचं दार पूर्णपणे बंद झालेलं नाही, पण संघाचं नियंत्रण आणि पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय घेणं मात्र आता त्यांच्याकडे नसेल. ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढे खेळत राहणार का, हे अजून पाहायचं आहे. वनडे क्रिकेटमधील मर्यादित संधींनंतरही खेळत राहण्याची त्यांच्यात तीव्र इच्छा आणि प्रेरणा आहे का आणि पुढील विश्वचषक खेळण्याची तयारी आहे का, हे येणारा काळ सांगेल.
जर या दोन्ही दिग्गज पुढे खेळू इच्छित असतील, तर त्यांना खेळाडू म्हणूनच सातत्याने कामगिरी करावी लागेल. रोहितकडून कर्णधारपद काढून घेणं हाच त्या दिशेने स्पष्ट संदेश आहे. कर्णधार म्हणून रोहितचा काळ अत्यंत यशस्वी राहिला आहे. रोहितचं वनडे कर्णधारपद काढून घेतलं आणि सोशल मीडियावर चाहत्यांचा उद्रेक झाला. चाहत्यांंचं रोहित-विराटवरील प्रेम याबाबत काही वेगळं सांगण्याची नक्कीच गरज नाही.
कोहली आणि रोहितच्या कसोटी कारकिर्दीच्या निवृत्तीवेळी चाहत्यांच्या भावना ओसंडून वाहत होत्या. पण मागील पिढीतील दिग्गजांनाही फारसा भव्य निरोप मिळाला नव्हता. सचिन तेंडुलकर हा अपवाद होता. पण त्यालाही निवड समिती आणि बोर्डाने सौम्य संकेत देऊन, २०१३ च्या वेस्ट इंडिज मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा करण्यास सांगितल्याचं आपण वाचलं आहे. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियातील अपयशी मालिकेनंतर माघार घेतली, सौरव गांगुलीला सौम्यपणे बाजूला करण्यात आलं आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजालाही निरोपाचा सामना मिळाला नाही.
आता या पिढीतील दोन खेळाडूंवर आहे की ते पुढे किती आणि कसं धावायचं ठरवतात. मात्र, यावेळी एक अट स्पष्ट आहे; अजित आगरकर यांच्या निवड समितीने हे निश्चित केलं आहे की निर्णय रोहित-विराटच्या इच्छेवर अवलंबून राहणार नाही, तर कामगिरीच त्यांचा मार्ग ठरवेल.