पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) चौवार्षिक निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता अन्य सर्व उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सर्वसाधारण सभेत मागे घेतले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक निरर्थक ठरवून प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. याची अधिकृत घोषणा रात्री उशिरापर्यंत ‘एमओए’च्या संकेतस्थळावरून करण्यात आली नव्हती.
अजित पवार आणि केंद्रीय हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सत्ताधारी पक्षातील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्यामुळे ही निवडणूक खेळापेक्षा राजकीय प्रतिष्ठेची झाली होती. त्याच वेळी धर्मादाय आयुक्ताने यापूर्वीचे दोन बदल फेटाळले. निवडणूक झाली असती तरी त्याच्या मान्यतेचा प्रश्न कायम राहिला असता, यामुळे बैठकीच्या फेऱ्या घेत निवडणुकीत चालढकल केली जात होती आणि यात दोन्ही राजकीय नेत्यांची मुत्सदी यशस्वी ठरल्याचे खासगीत बोलले जात होते.
मुंबईत ‘एमओए’ची सर्वसाधारण बैठक दुपारी दोन वाजता सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात दुपारी चार-साडेचारपर्यंत बंद खोलीत नुसत्या चर्चा पार पडत राहिल्या. अखेर संध्याकाळी अजित पवार वगळता सर्वच उमेदवारांनी माघार घेत असल्याचे लिहून दिल्याने निवडणुकीवर निरर्थकतेचा शिक्का पडला आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेत सर्व कार्यकारिणी निश्चित करण्याचे अधिकार पवार यांना देण्याचे जाहीर करण्यात आले.
नवी सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबरला मुंबईत
सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अजित पवार हेच अध्यक्ष म्हणून निश्चित झाले आणि त्यांनी नंतर सर्वसाधारण सभेत अधिकार वापरून नव्याने मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून घोषणा केली. त्याच वेळी २९ जणांची कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी पवार यांनी प्रत्येक संघटनेच्या एका, तर काही संघटनेच्या दोघांची निवड करून ३५ प्रतिनिधींची यादी निश्चित केली. आता ही यादी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम करण्यात येणार आहे आणि २३ नोव्हेंबरला मुंबईतच होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अजित पवार नवी कार्यकारिणी जाहीर करतील.
