क्रिकेटच्या मैदानातले किस्से आपल्याला अनेकदा टीव्हीवर पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटपटूंच्या ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानाबाहेर पव्हेलियनमध्येदेखील अनेक गंमतीदार घटना घडतात. या घटना अनेकदा क्रिकेटपटू मुलाखतींच्या वेळी उलगडतात. असाच एक किस्सा माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नुकताच उलगडला आहे. सप्तक नागपूर आणि छाया दीक्षित वेल्फेअर फाऊंडेशनने 'स्ट्रेट ड्राईव्ह' या मुलाखतीच्या कार्यक्रमात गावसकर यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी गावसकर यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत लेले यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केली आहे. यावेळी गावसकरांनी क्रिकेटच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील अनेक गंमतीजमती सांगितल्या आहेत. सुनील गावसकर यांनी १९७०-७१ च्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यामधील एक किस्सा सांगितला. गावस्कर म्हणाले की, "आम्ही वेस्ट इंडिज दौऱ्यावर होतो. उभय संघांमधील कसोटी मालिकेतला पहिला सामना आम्ही जिंकला होता. या मालिकेत सामन्याचा प्रत्येक दिवस संपल्यावर आम्ही दोन्ही संघांमधले खेळाडू तिथल्या क्लब रेस्टॉरंटमध्ये जमायचो, गप्पा मारायचो. दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्षेत्ररक्षकांनी मला अनेकदा जीवदान दिलं होतं. त्यावर गॅरी सोबर्स मला म्हणाले की, मी प्रत्येक सामन्यापूर्वी तुझ्याकडे येऊन तुझं गुड लक मला मिळावं यासाठी तुला टच करेन. मी म्हटलं ठिक आहे. त्याच्या पुढच्या दिवशी वेस्ट इंडिजची फलंदाजी होती." गावसकर म्हणाले की, ही चर्चा झाली त्याच्या आदल्या दिवशी सोबर्स हे क्लाईव्ह लॉईडचा धक्का लागल्यामुळे धावबाद झाले होते. तसेच त्याआधीच्या काही सामन्यांमध्ये ते धावा करू शकले नव्हते. त्यांना विकेट्स मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका सुरू होती. त्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी सोबर्स आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी मला हात लावला. ते म्हणाले अरे कुठे होतास तू. एवढं बोलून ते मैदानात गेले आणि त्यांनी शतक ठोकलं. तो सामना अनिर्णित राहिला. "चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी सोबर्स आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आले आणि लेट मी टच यू असं मला म्हणाले. त्यांनी मला हात लावला आणि मैदानात गेले. त्या दिवशी त्यांनी १७८ धावा फटकावल्या. पुढच्या इनिंगआधी ते आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी मला हात लावला. त्यानंतर ते मैदानात गेले. त्या इनिंगमध्ये त्यांनी १३२ धावा फटकावल्या." …आणि अजित वाडेकरांनी सुनील गावसकर यांना बाथरूममध्ये कोंडलं त्यानंतर सामन्याचा सहावा दिवस होता. त्यादिवशी सकाळी आमच्या ड्रेसिंग रुमबाहेर सोबर्स त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणाले चला "मी अजित (भारताचे तेव्हाचे कर्णधार) आणि त्याच्या सहकाऱ्यांना भेटून येतो. अजितने हे ऐकलं आणि त्याने मला पकडून बाथरूममध्ये बंद केलं. मी म्हटलं अरे अजित मला फलदाजीला जायचं आहे. अजित तुला खरंच असं वाटतंय का की, सोबर्स मला स्पर्श करतोय म्हणून हे सगळं होतंय. तो (सोबर्स) मला मैदानातदेखील स्पर्ष करू शकतोच की. पण अजितने काही ऐकलं नाही. त्यानंतर गॅरी आला, त्याने सर्वांशी गप्पा मारल्या, हसला आणि निघून गेला. त्यानंतर मला कप्तान वाडेकरने बाहेर काढलं. त्यानंतर मी मैदानात गेलो. भारताची फलंदाजी झाली. उर्वरित दिवसात वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी १८० ते १९० धावा करणं गरजेचं होतं. त्यामुळे सोबर्स वरच्या नंबरवर फलंदाजीला आले. त्या दिवशी सय्यद अबिद अलीने सोबर्सला शून्यावर बाद केलं. त्या दिवशी संध्याकाळी अजित वाडेकर मला म्हणाला. बघितलंस ना… त्यावर मी खूप हसलो.