Akash Deep Wicket of Ollie Pope Video IND vs ENG: आकाशदीपने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या एजबेस्टन कसोटीत आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. आकाशदीपने पहिल्या डावात ४ विकेट्स घेत भेदक गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराह वर्कलोड कारणामुळे दुसऱ्या कसोटीत खेळत नाहीये, त्याच्या अनुपस्थितीत आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. आकाशदीपने बुमराहच्या अनुपस्थितीत कमालीची गोलंदाजी करत त्याची उणीव भासू दिली नाहीये. आता दुसऱ्या डावात आकाशदीने इंग्लंडच्या टॉप-५ फलंदाजांना मैदानावर टिकू दिलं नाही.

आकाशदीपने दुसऱ्या डावात इंग्लंडचे टॉप फलंदाज बेन डकेट, जो रूट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूक यांच्या विकेट घेतल्या. ब्रुकला आकाशदीपने पायचीत केलं. तर इतर तिन्ही फलंदाजांना त्याने क्लीन बोल्ड केलं. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर आकाशदीपने सामन्यातील चौथ्या षटकात पहिल्याच चेंडूवर ऑली पोपला माघारी धाडलं.

इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या अखेरीस ३ विकेट्स गमावत ७२ धावा केल्या. भारताने दिलेल्या ६०८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिराज-आकाशदीपच्या जोडीने इंग्लंडचे चौथ्या दिवशीच ३ विकेट्स गमावले होते. यासह इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी ५३६ धावांची गरज आहे. पण इंग्लंडला पाचव्या दिवशीच सुरूवातीला आकाशदीपने इंग्लंडला धक्का दिला.

आकाशदीपने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात पोपला बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. आकाशदीपने २०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पोपचा त्रिफळा उडवला. आकाश एकदम योग्य लेंग्थवर सातत्याने गोलंदाजी करत आहे. आकाशने पहिलाच चेंडू टाकला ज्यावर त्याला अतिरिक्त बाऊन्स मिळाला. पोप डिफेन्स करायला गेला पण त्याची बॅट खाली राहिली आणि चेंडू त्याच्या मागच्या हाताच्या कोपराला लागला. कोपराला लागून चेंडू मैदानावर पडला आणि टप्पा पडून थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि पोपही चकित होत पाहत राहिला.

आकाशदीपने बेल्स उडलेल्या पाहताच मैदानावर उडी मारत आनंद साजरा केला. यासह ऑली पोप ३ चौकारांसह ५० चेंडूत २४ धावा करत बाद झाला. तर आकाशदीपला त्याची तिसरी विकेट मिळाली. यानंतर आकाशने त्याच्या पुढच्या षटकात हॅरी ब्रूकला देखील माघारी धाडलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाशदीपचा परफेक्ट चेंडू ब्रुकच्या पायावर आदळला आणि झाला बाद

आकाशदीपने २२व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हॅरी ब्रूकला पायचीत केलं. आकाशदीपने पहिल्या डावातही ३०३ धावांची भागीदारी तोडण्यासाठी हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केलं आहे. आकाशदीपने त्याचे लेंग्थवर चेंडू टाकला आणि यावेळेस चेंडू जाऊन त्याच्या मागच्या पायावर जाऊन आदळला. ब्रूकने रिव्ह्यू घेतला पण निर्णय मात्र भारताच्या दिशेने लागले.