Akashdeep Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना एजबस्टनमध्ये पार पडला. भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर ६०८ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाकडून आकाशदीपने सर्वाधिक ६ गडी बाद केले. आकाशदीपने या सामन्यातील पहिल्या डावात ४ गडी बाद केले होते. दरम्यान दोन्ही डावात मिळून त्याने १८७ धावा खर्च करत १० गडी बाद केले. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
आकाशदीपची विक्रमी कामगिरी
या सामन्यासाठी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी आकाशदीपचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. बुमराहची जागा भरणं कठीण आहे, पण आकाशदीपने असा काही कारनामा करून दाखवला जो येणारे कित्येक वर्ष लक्षात ठेवला जाईल. त्याने इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आकाशदीपने ४१.१ षटक गोलंदाजी केली.
यादरम्यान त्याने १८७ धावा खर्च केल्या आणि १० गडी बाद केले. याआधी इंग्लंडमध्ये गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॉर्ड हा चेतन शर्मा यांच्या नावावर होता. चेतन शर्मा यांनी इंग्लंडमध्ये १९८६ मध्ये गोलंदाजी करताना एका कसोटी सामन्यात ५३.३ षटक गोलंदाजी करत १८८ धावा खर्च करून १० गडी बाद केले होते. आता ३९ वर्षांनंतर आकाशदीपने त्यांचा हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
आकाशदीपकडे भारतीय संघासाठी फार कसोटी सामने खेळण्याचा अनुभव नाही. त्याला २०२४ मध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून त्याला ८ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २५ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने एक वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. त्याला आतापर्यंत केवळ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
हा विजय भारतीय संघासाठी अतिशय खास ठरला आहे. कारण भारतीय संघाला एजबस्टनमध्ये आजवर एकही सामना जिंकता आला नव्हता. पण, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने करून दाखवलं आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं डोंगराइतकं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २७१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ३३६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.