Akashdeep 2 wickets in Quick Succession Video IND vs ENG: भारत वि. इंग्लंड दुसऱ्या कसोटीत भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघ पहिल्या डावात ५८७ धावा करत सर्वबाद झाला. यामध्ये शुबमन गिलने द्विशतक करत २६९ धावांची विक्रमी खेळी केली. तर जैस्वाल, जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली साथ देत संघाच्या धावांमध्ये मोठी भर घातली. यासह इंग्लंडच्या डावाला सुरूवात होताच भारताने सुरूवातीला दोन विकेट घेतले आहेत.
कर्णधार शुबमन गिलने पहिल्या डावात द्विशतक झळकावत भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेलं. दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय कर्णधार बनला. त्याने विराट कोहलीला मागे टाकलंय. २०१९ मध्ये भारतीय कर्णधार म्हणून कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात २५४ धावांची खेळी केली. आता गिलने कसोटी क्रिकेटमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
गिलने फक्त फलंदाजीत नाही तर विकेटमध्येही मोठं योगदान केलं. गिलने कमालीची डाईव्ह करत चेंडू टिपला आणि भारताला पहिली विकेट मिळाली. दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाशदीपला गोलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. त्याने पहिल्याच डावात आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं.
शुबमनचा डाईव्ह मारत अफलातून झेल
आकाशदीपला पहिल्या डावात गोलंदाजी आक्रमणाला सुरूवात करण्याची संधी दिली. आकाशदीपच्या पहिल्या षटकात जॅक क्रॉलीने दोन चौकार लगावत सुरूवात केली. त्यामुळे बुमराहची उणीव भासणार का अशी चर्चा सुरू होती. पण आकाशदीपने त्याच्या स्पेलमधील पुढच्या म्हणजेच तिसऱ्या षटकात दोन विकेट घेतल्या. आकाशदीपने बेन डकेटला पहिल्या ३ चेंडूवर एकही धाव दिली नाही.
आकाशदीपच्या चौथ्या चेंडूवर डकेट चेंडू खेळायला गेला आणि त्याच्या डाव्या बाजूच्या दिशेने फटका खेळला. तिथे स्लिपमध्ये गिल तैनात होता आणि त्याने बाजूला डाईव्ह मारत कमालीचा झेल टिपला आणि पहिली विकेट मिळवून दिली. डकेट खातंही न उघडता शून्यावर बाद झाला.
केएल राहुने दोन प्रयत्नात टिपला झेल
डकेट बाद झाल्यानंतर ऑली पोप फलंदाजीला आला. पोप पहिलाच बॉल खेळायला गेला आणि कट लागून मागच्या दिशेने उडाला. तिथे उभ्या असलेल्या राहुलने स्लिपमध्ये झेल टिपला. आधी राहुलच्या हातून चेंडू सुटला पण त्याने दुसऱ्या प्रयत्ना मात्र हा झेल टिपला आणि २ चेंडूत भारताला २ मोठे विकेट मिळाले. ऑली पोप आणि बेन डकेट यांनी पहिल्या कसोटीत शतकं झळकावली होती.