एपी, सिडनी
सौदी अरेबियाने जागतिक फुटबॉलवर पकड मिळवण्याच्या दृष्टीने आपली धडपड सुरू ठेवताना फ्रान्सचा तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापेवर विक्रमी बोली लावली आहे. सौदी अरेबियातील अल-हिलाल क्लबने एम्बापेला संघात दाखल करून घेण्यासाठी फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनला तब्बल ३० कोटी युरो (२७ अब्ज १९ कोटी ७७ लाख रुपये) देण्याची तयारी दर्शवली आहे. सेंट-जर्मेनने ही बोली स्वीकारल्यास एम्बापे फुटबॉल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल.
एम्बापेचा सेंट-जर्मेनचा करार आगामी हंगामाअंती संपुष्टात येणार आहे. त्यानंतर आपण करार वाढवणार नसल्याचे एम्बापेने सेंट-जर्मेनला कळवले आहे. त्यामुळे सेंट-जर्मेनने त्याला विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अल-हिलाल क्लबने एम्बापेला खरेदी करण्यासाठी विक्रमी बोली लावली आहे. सेंट-जर्मेनने या वृत्ताला दुजोरा देताना अल-हिलाल क्लबला एम्बापेशी चर्चा करण्याची परवानगी दिली आहे. सेंट-जर्मेनने अल-हिलालची बोली स्वीकारली, तरी सौदीमध्ये खेळण्यासाठी एम्बापेनेही होकार देणे गरजेचे आहे.
एम्बापे आणि सेंट-जर्मेन यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावपूर्ण झाले आहेत. एम्बापेचा सेंट-जर्मेनसोबतचा करार आगामी हंगामाअंती संपुष्टात येणार असला, तरी तो एका वर्षांने वाढवण्याचा एम्बापेकडे पर्याय होता. मात्र, त्याने करार न वाढवण्याचा निर्णय घेतला. तो पुढील हंगामापासून स्पेनमधील बलाढय़ संघ रेयाल माद्रिदकडून खेळण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. रेयालचीही त्याला संघात दाखल करून घेण्याची तयारी आहे. मात्र, आगामी हंगामाअंती करार संपुष्टात आल्यानंतर एम्बापे दुसऱ्या क्लबशी करारबद्ध झाल्यास सेंट-जर्मेनला काहीही मोबदला मिळणार नाही. त्यामुळे सेंट-जर्मेनने त्याची विक्री करण्याचे ठरवले आणि जगभरातील आघाडीच्या क्लबना त्याच्यासाठी बोली लावण्याचे आवाहन केले. तसेच आगामी हंगामाच्या तयारीसाठी सेंट-जर्मेचा संघ सध्या जपानच्या दौऱ्यावर असून यातून एम्बापेला वगळण्यात आले आहे.
एम्बापेची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गजांचा वारसा पुढे चालवणारा खेळाडू म्हणून एम्बापेकडे पाहिले जाते. त्यामुळे एम्बापेने सौदीमध्ये खेळण्यास होकार दिल्यास युरोपीय फुटबॉलसाठी हा मोठा धक्का असेल.