Asia Cup 2025 Updates: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना २८ सप्टेंबरला रंगणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. दरम्यान स्पर्धेतील सामने यूएई, दुबई आणि अबूधाबीमध्ये खेळवण्या येणार आहे. हे सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होतील. तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. दरम्यान जाणून घ्या या स्पर्धेबद्दल सर्वकाही

यावेळी आशिया चषकाचे आयोजन दुबईत का करण्यात आले आहे?

आशिया चषकाचे आयोजन दुबईत का करण्यात आले आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ देखील सहभाग घेत आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पण पाकिस्तानला भारतात येण्यावर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन दुबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आशिया चषक स्पर्धेचा इतिहास

आशिया चषक स्पर्धेची सुरूवात १९८४ मध्ये झाली होती. ज्यात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकाक या ३ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा विस्तार व्हावा म्हणून या स्पर्धेत आशियातील आणखी देशांना आमंत्रण दिलं गेलं. २००८ पासून या स्पर्धेचे आयोजन एका वर्षानंतर केले जाते. २०२० मध्ये कोरोना असल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन केले गेले नव्हते. याआधी झालेल्या २०२३ आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी ओमानचा संघ पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

आशिया चषक स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये होणार?

याआधी २०२३ मध्ये झालेल्या आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले गेले होते. भारतात होणाऱ्या २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन वनडे फॉरमॅटमध्ये केले गेले होते. आता २०२६ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा पाहता आशिया चषकाचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये करण्यात आले आहे.

या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर

या स्पर्धेत काही युवा खेळाडू खेळताना दिसून येणार आहे,ज्यांच्यावर सर्वांची नजर असणार आहे. भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळणार आहे. कमी वयात त्याच्या नावे २ टी-२० आंतरराष्ट्रीय शतकं झळकावण्याची नोंद आहे. आतापर्यंत त्याला १७ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

अफगाणिस्तानचा १९ वर्षीय फिरकीपटू गजनफर देखील पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. त्याने ११ वनडे सामन्यांमध्ये २ वेळा एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तर पाकिस्तानचा ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज सलमान मिर्झाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. तो आता आशिया चषकात कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.