संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईतील वानखेडे स्टेडियमला चार साखळी सामन्यांसह उपांत्य फेरीतील एका सामन्याच्या आयोजनाचा मान मिळाला. या सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले.

‘‘मुंबईला पाच सामन्यांच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा आणि खजिनदार आशीष शेलार यांचे आभार मानतो. त्यांनी विश्वचषक सामन्यांचे चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे,’’ असे काळे म्हणाले.‘‘मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) सामन्यांच्या आयोजनासाठी नेहमीच तयार असते. मात्र, हे सामने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील असल्याने त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत ‘एमसीए’तर्फे स्टेडियम, मैदानाच्या सुधारणेचे काम हाती घेण्यात येईल. मुंबईतील पहिला सामना २१ ऑक्टोबरला आहे. स्टेडियम हे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज असेल. यासाठीचे नियोजनही आम्ही यापूर्वीच आखले आहे. वानखेडे स्टेडियममधील स्वच्छतागृहांची चांगल्या पद्धतीने डागडुजी करण्यात येईल. यासह ‘वातानुकूलित बॉक्स’देखील अधिक चांगला करण्यावर आमचा भर राहील. तसेच अजून काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू,’’ असे काळे यांनी सांगितले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २०११च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेला नमवत २८ वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक उंचावला होता.

सचिनच्या पुतळय़ाचे विश्वचषकादरम्यान अनावरण

काही महिन्यांपूर्वी ‘एमसीए’ने सचिन तेंडुलकरचा पुतळा वानखेडे स्टेडियमच्या परिसरात बसवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. सचिन स्वत: पुतळय़ाच्या जागेची पाहणी करण्यासाठी पोहोचला होता. सचिनच्या पुतळय़ाचे विश्वचषकादरम्यान अनावरण करण्यात येईल, असे काळे यांनी सांगितले. ‘‘सचिन तेंडुलकरचा पुतळा तयार करण्याचे कार्य सुरू असून, १५ सप्टेंबपर्यंत आमच्याकडे पुतळा देण्यात येईल. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत मुंबईत होणाऱ्या सामन्यांदरम्यान वेळेचे नियोजन करून या पुतळय़ाचे अनावरण करण्यात येईल.’’