India Women’s Coach Amol Muzumdar Welcome at Home Video: भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेला नमवत वर्ल्ड चॅम्पियन ठरला. महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद करत ५२ धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली आणि कोच अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनासह भारतीय महिला संघाने या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. देशभरात जल्लोषाचं वातावरण असताना कोच अमोल मुझुमदार यांचं त्यांच्या राहत्या घरी दणक्यात स्वागत झालं आहे.

भारतीय संघाचे कोच अमोल मुझुमदार यांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या विश्वचषक विजयात फार मोलाचं ठरलं. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमीफायनलमध्ये भारताने वर्ल्ड रेकॉर्ड रचत विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावानंतर ड्रेसिंग रूममध्ये फळ्यावर एक वाक्य लिहिलं होतं की, तुम्हाला फक्त ऑस्ट्रेलियापेक्षा एक धाव जास्त करायची आहे. वाक्य साधं आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा होता. सातत्याने संघाला मार्गदर्शन करणं, त्यांचा आत्मविश्वास ढासळू न देणं यामागे सर्वात मोठं योगदान अमोल मुझुमदार व त्यांच्या सपोर्ट स्टाफचं आहे.

डी वाय पाटीलच्या मैदानावर झालेल्या सामन्यानंतर कोच अमोल मुझुमदार ३ नोव्हेंबरला संध्याकाळी पार्ल्यातील त्यांच्या घरी परतले. यादरम्यान त्यांच्या सोसायटीतील लोकांनी त्यांना मोठं सरप्राईज देत त्यांचं स्वागत केलं. ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वर्ल्डकप विजेते कोच अमोल मुझुमदार स्वागताने भारावल्यानंतर काय म्हणाले?

टीम इंडियाचा कबीर खान अशी उपमा त्यांना दिली जात आहे. अमोल मुझुमदार त्यांच्या कारने जेव्हा सोसायटीमध्ये येत होते. तेव्हा इंडिया इंडियाचे नारे सुरू होते, तर बाहेर ढोल, तुतारी वादनाने त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर बॅटने त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. यादरम्यान अमोल अमोल अशा घोषणाही दिल्या जात होत्या.

भारतीय महिला संघाचा ट्रॉफी घेतानाचा फोटो व कोच अमोल मुझुमदार यांचा ट्रॉफीसह फोटोचा बॅनर लावण्यात आला. कोच अमोल यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर कोच अमोल मुझुमदार यांनी चाहत्यांबरोबर फोटो काढले.

कोच अमोल मुझुमदार म्हणाले, “माझं हे असं स्वागत होईल असं मला अपेक्षित नव्हतं. मी फक्त पत्नीला कॉल करून सांगितलं, मी आज रात्री गपचुप घरी येतो. कारण उद्या सकाळी मला परत जायचं आहे. मी परवानगी घेऊन फक्त घरी आलो, जेणेकरून वरण भात तूप खाईन. मला हे खरंच सर्व अपेक्षित नव्हतं. पण तुम्ही सर्व आलात आणि सगळ्यांनी मला भरभरून मला शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्यासाठी मी माझं कुटुंब, माझे आई-वडिल सर्व मुझुमदार कुटुंबाकडून आभारी आहे.”

पुढे कोच म्हणाले, “तुम्ही माझ्या वडिलांचा विषय काढलात तर त्यांनी मला नेहमी एकच गोष्ट सांगितली आणि काल मैदानावरही त्यांनी एकच गोष्ट सांगितली, काम करत राहा. मी जेव्हा खेळत होतो तेव्हा ते म्हणायचे रन्स करत राहा, बाकी सर्व देव बघून घेईल. पण मला माहित नव्हतं की, धावा करत राहा आणि काम करत राहा याचं फळ म्हणजे वर्ल्डकप भारतात येईल असं, मला अजिबात वाटलं नव्हतं.”

११ नोव्हेंबरला कोच अमोल मुझुमदार यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे भारतीय संघाने विश्वचषक जिंकत वाढदिवसाचं गिफ्ट आधीच दिलं आहे. कोच अमोल मुझुमदार एबीपी माझाला मुलाखत देताना म्हणाले, आम्ही ३० ऑक्टोबरसाठी नाही तर २ नोव्हेंबरसाठी मेहनत करत होतो आणि २ नोव्हेंबर हा दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असेल.