पाचवेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पध्रेच्या दुसऱ्या डावात अर्मेनियाचया लेव्हॉन अ‍ॅरोनियनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोव्हला पराभूत करणाऱ्या आनंदला दुसऱ्या डावात अ‍ॅरोनियनने ३१व्या चालीनंतर बरोबरी पत्करण्यास भाग पाडले.

रशियाच्या सेर्गेय कर्जाकिनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभूत करून आनंदसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. आनंद आणि कर्जाकिन यांच्या खात्यात प्रत्येक दीड गुण जमा आहेत. कर्जाकिनचा विजय वगळता दुसऱ्या डावातील उर्वरित सामने बरोबरीतच सुटले. नेदरलँडचा अनिष गिरी आणि अमेरिकेच्या फॅबिआनो करुअ‍ॅना यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तर रशियाच्या पिटर स्व्हीडलरने टोपालोव्हचे आव्हान सहज परतवत सामना अनिर्णीत सोडवला.

पहिल्या डावात टोपालोव्हविरुद्धच्या  सामन्यात आनंदला नशिबाचीही साथ मिळाली. टोपालोव्हकडून काही डावपेच चुकले. आनंदने राय लोपेझ चालीने डावाची सुरुवात केली. राजासमोरील प्यादे पुढे सरकवत आनंदने आक्रमणावर भर दिला.   डावाच्या मध्यंतराला टोपालोव्हची पकड सैल झाली आणि त्यानंतर त्याला पुनरागमन करणे जमले नाही. ४५व्या चालीत टोपालोव्हने पराभव पत्करला.