विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला नॉर्वे बुद्धिबळ २०१३ सुपर स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत बरोबरीत रोखले. सहजपणे सामना बरोबरीत राखून आनंद आणि कार्लसन यांच्यात या वर्षांच्या अखेरीस होणारी विश्वविजेतेपदाची लढत आनंदने मानसिकदृष्टय़ा जिंकली, अशी चर्चा आहे.
आनंद आणि कार्लसन यांच्यातील लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. कार्लसनने याआधी आनंदवर मॉस्को व्हेरिएशन पद्धतीने विजय मिळवला होता. या सामन्यातही त्याने याच पद्धतीचा अवलंब केला. पण आनंदने सिसिलियन बचाव पद्धतीने त्याला उत्तर दिले. आनंद यावेळी जास्त तयारीत असल्यामुळे कार्लसनला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा उठवता आला नाही. कार्लसनने आनंदवर कुरघोडी करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण आनंदने त्याच्या चालींना तोडीस तोड उत्तर देत सामना ५९व्या चालीनंतर बरोबरीत राखला.
अन्य लढतीत अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियन याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याचा पराभव केला. रशियाच्या सर्जी कार्याकिन याने नॉर्वेच्या जोन लुविग हॅमर याला हरवले तर रशियाच्या पीटर स्विडलरला चीनच्या वँग हाओ याच्याकडून हार पत्करावी
लागली. दुसऱ्या फेरीअखेर कार्याकिनने दोन गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे.