भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला ग्रेनके क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू फॅबिआनो कारुआना याच्याशी खेळावे लागणार आहे. या स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ होत आहे.
आनंदने या स्पर्धेत २०१३मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. त्याला या स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसन या विश्वविजेत्याचेही आव्हान आहे. दोन वेळा विश्वविजेतेपद मिळवणारा कार्लसन हा येथे विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेत लिवॉन आरोनियन (अर्मेनिया), मायकेल अ‍ॅडम्स (इंग्लंड), एटिनी बॅक्रोट (फ्रान्स), अर्केदिज नैदितिश व डेव्हिड बॅरामिझ (जर्मनी) यांचाही सहभाग असल्यामुळे सामने रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धेतील लढती अव्वल साखळी पद्धतीने होणार आहेत. आनंदने कार्लसनविरुद्धच्या पहिल्या विश्वअजिंक्यपद लढतीत पराभव स्वीकारल्यानंतर लंडन क्लासिक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. ही कामगिरी करताना त्याने कारुआना व व्लादिमीर क्रामनिक यांना मागे टाकले होते. कार्लसन याने नुकत्याच झालेल्या टाटा स्टील चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. कारुआना हादेखील संभाव्य विजेता खेळाडू मानला जात आहे. त्याने २८५१ मानांकन गुण मिळवीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कार्लसनपुढे त्याचेच मुख्य आव्हान असणार आहे.