वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सर्वात प्रथम रविचंद्रन अश्विन आणि नंतर रोहित शर्मा, पाठोपाठ विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाल्याची भावना व्यक्त करताना भारताचा माजी कर्णधार आणि सर्वाधिक गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी या सर्वांना अखेरचा सामना खेळण्याची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे.

‘‘रोहित शर्मानंतर एकाच आठवड्यात विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. कसोटी क्रिकेटमधील दोन अनुभवी खेळाडूंनी इतक्या झटपट निवृत्त होणे खटकते. कोहली अजून क्रिकेट खेळेल असे वाटले होते. कुठलाही खेळाडू आनंदाने निवृत्त होत नाही. निर्णय घेण्यापूर्वी त्याने खूप विचार केला असेल यात शंका नाही. त्याच्या निर्णयाचा आदर करायलाच हवा,’’ असे कुंबळे म्हणाले.

‘‘प्रत्येक खेळाडूने निवृत्ती घ्यायला हवी. पण, ती मैदानावर खेळून अशा मताचा मी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांत विचित्र घडामोडी घडल्या. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच अश्विनने निवृत्ती घेतली आणि तो मायदेशी परत आला. त्यानंतर रोहितने असाच निर्णय घेतला आणि आता कोहलीने देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. या तिघांचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेता त्यांना चाहत्यांसमोर अखेरच्या सामन्यात मैदानात उतरण्यासाठी संधी द्यायला हवी होती,’’असे स्पष्ट मत कुंबळे यांनी मांडले.

‘‘या दोघांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आगामी इंग्लंडचा दौरा निश्चित कठीण असेल. रोहित निवृत्त झाल्यावर इंग्लंड दौऱ्यासाठी कोहली राहील अशी अपेक्षा होती. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका आहे. या दोघांपैकी एक जण तेथे असायला हवा होता,’’ असेही कुंबळे म्हणाले.

पुढील विश्वचषक खेळण्याची शक्यता कमीच – गावस्कर

कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आणि कोहली एकदिवसीय क्रिकेटवर कितीही लक्ष केंद्रित करणार असले, तरी विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्यांची लय कायम राहील याची कोणी खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे पुढील विश्वचषक स्पर्धा ते खेळण्याची शक्यता कमीच असल्याचे गावस्कर म्हणाले. अर्थात, हे सगळे निवड समितीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. आणखी दोन वर्षे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळ करू शकतील आणि ज्या पद्धतीने योगदान देत आहेत तसेच दोन वर्षांनीही देतील असे निवड समितीला वाटले, तर दोघे पुढील विश्वचषक स्पर्धा खेळू शकतील, असेही गावस्कर म्हणाले. ‘‘रोहित आणि विराट दोघांच्याही निवृत्तीचे मला आश्चर्य वाटले नाही. दोघांनीही स्वत:हून निवृत्ती घेतली. या दोघांच्या निवृत्तीचा विषय निवड समिती अध्यक्ष या नात्याने अजित आगरकर यांनी योग्य पद्धतीने हाताळला आहे,’’ असे गावस्कर यांनी यावेळी सांगितले.

कोहलीच्या निवृत्तीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सध्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा मोठा प्रश्न आहे. कोहलीची जागा घेणारा फलंदाज शोधण्यासाठी किमान दोन मालिका जाव्या लागतील.

चेतेश्वर पुजारा, भारताचा कसोटीपटू

क्रिकेटच्या अतिरेकामुळे विराटने निर्णय घेतला असावा. त्याने कधीच विक्रमांचा पाठलाग केला नाही. त्याच्यावर कुणाचा दबाब होता असेही वाटत नाही. निश्चितपणे हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे.

सय्यद किरमाणी, माजी यष्टिरक्षक