WPL 2023 1st Match MIW vs GGW: भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्राने महिला प्रीमियर लीग (WPL) च्या उद्घाटन हंगामात बहुतेक परदेशी खेळाडूंना संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सक्षम भारतीय खेळाडूंना ही जबाबदारी दिली गेली पाहिजे होती, असे ती म्हणाली.

अंजुम ऑनलाइन मीडिया सेशनमध्ये म्हणाली, “बहुतेक संघांनी परदेशी खेळाडूंना कर्णधार म्हणून निवडले, हे मला आवडले नाही. ही एक भारतीय लीग आहे आणि ती भारतीय परिस्थितीत खेळवली जाईल. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंमध्ये क्षमता असेल, तर त्यांनी कर्णधार व्हायला हवे होते.”

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी अनुक्रमे हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या रूपाने भारतीय खेळाडूंचे नेतृत्व केले आहे तर इतर संघ नेतृत्वासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर अवलंबून आहेत. यामध्ये मेग लॅनिंग (दिल्ली कॅपिटल्स), बेथ मुनी (गुजरात जायंट्स) आणि अॅलिसा हिली (यूपी वॉरियर्स) कर्णधाराच्या भूमिकेत असतील. अंजुम म्हणाली, “माझ्या मते दीप्ती शर्मा (यूपी वॉरियर्स) हिला कर्णधार बनवायला हवे होते. तिने महिला टी-२० चॅलेंजमध्ये संघाचे नेतृत्व केले होते.”

अंजुमने मात्र सहा वेळा टी-२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाकडे भारतीयांपेक्षा अनुभवी खेळाडू असल्याचे मान्य केले. ती म्हणाली, “ऑस्ट्रेलियन खेळाडू हे जगज्जेते आहेत आणि त्यांना त्यांच्या देशातील आघाडीच्या संघांचा अनुभव आहे. मी तिच्या (ऑस्ट्रेलियन खेळाडू) अनुभवाशी (आंतरराष्ट्रीय स्तरावर) पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळे मेग लॅनिंग असताना जेमिमा रॉड्रिग्जला कर्णधार बनवता येणार नाही. या बाबतीत भारतीय खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे कर्णधारपदाची क्षमता नाही.”

ती पुढे म्हणाली, “भारतीय खेळाडूंसाठी हे नेहमीच आव्हानात्मक असेल, कारण तुम्ही भारतात फ्रँचायझी-आधारित स्पर्धा खेळत आहात.” अंजुम म्हणाली की देशांतर्गत खेळाडूंना खेळाच्या दिग्गजांसह खेळण्याची ही चांगली संधी असेल. ती म्हणाली, “मी या लीगमधून जे मोठे चित्र पाहत आहे, ते अंडर-१९ खेळाडूंबाबत आहे. हे खेळाडू अंडर-१९ विश्वचषक जिंकतील आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळतील, जिथे त्यांना मेग लॅनिंग, बेथ मुनी आणि हरमनप्रीत कौर यांसारख्या खेळाडूंसोबत खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी मिळेल.”

हेही वाचा – WPL 2023 MI vs GG: महिला प्रीमियर लीगमध्ये ‘ही’ दहावीची विद्यार्थिनी गुजरात जायंट्ससाठी गाजवणार मैदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंजुम म्हणाली, “ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल. भारतीय देशांतर्गत खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल, विदेशी खेळाडूंना आपण ओळखतो, परंतु भारतीय देशांतर्गत खेळाडूंबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही.” डब्ल्यूपीएल भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास अंजुमला आहे. ती म्हणाली, “बर्‍याच दिवसांची प्रतीक्षा होती, पण अखेर लीग सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाला हरवण्याची तयारी नाही. हे एक चांगले क्रिकेटर बनण्याबद्दल आहे.”