भारतीय संघाने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत ३-० अशी मात केली. यानंतर आता दोन्ही संघ ५ वन-डे आणि टी-२० सामन्याच्या मालिकेत समोरासमोर येतील. दोन्ही संघांमधला पहिला वन-डे सामना हा रविवारी म्हणजेच उद्या दम्बुल्लाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र कसोटी मालिका जिंकल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळेत विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी श्रीलंकेत पर्यटनाचा आनंद लुटला. विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही नुकतीच श्रीलंकेत दाखल झाली. यावेळी दोघेही जण काही श्रीलंकन चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसले होते.
विराट आणि अनुष्का शर्माचं नातं हे आता जगजाहीर झालेलं आहे. वारंवार विराट आणि अनुष्का एकत्र सुट्टीवर जाताना सर्व चाहत्यांनी पाहिलेलं आहे. दरम्यान श्रीलंकेत असताना अनुष्काने लंकेचा फलंदाज चमारा कपुगेदरासोबतही सेल्फी काढला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. कपुगेदरानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. यावेळी अनुष्का ही आपली सर्वात आवडती अभिनेत्री असल्याचंही कपुगेदराने मान्य केलं.
अवश्य वाचा – सोशल मीडियावर पुन्हा विरुष्काचे वारे
कसोटी मालिका ३-० ने जिंकत भारताने मोठ्या कालावधीनंतर परदेशात कसोटी मालिका जिंकलेली आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी संघांची बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून श्रीलंकेविरुद्धची वन-डे मालिकाही जिंकण भारतासाठी महत्वाचं ठरणार आहे.