2 एप्रिल 2011ला भारताने एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. यंदा भारताच्या विश्वविजेतेपदाला दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. तब्बल 28 वर्षांनंतर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला. अंतिम सामन्यात गौतम गंभीर आणि धोनीने शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

 

ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ शेजारी बसलेले दिसत आहेत. या फोटोत अर्जुनने मुंबई इंडियन्सची जर्सी आणि कॅप घातली आहे. हा फोटो पाहून चाहते सोशल मीडियावर विविध कमेंट्स करत आहेत. आयपीएल 2021च्या लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी केले. तो आता पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. तर, पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉने जबरदस्त कामगिरी केली. या हंगामात 800पेक्षा जास्त धावा काढणारा तो पहिला फलंदाज ठरला. शॉने 8 सामन्यांत 165.40 च्या उत्कृष्ट सरासरीने 827 धावा केल्या. आयपीएलच्या तेराव्या पर्वात आणि त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वीच्या फलंदाजीवर खूप टीका झाली. त्यानंतर मात्र, शॉच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम सामन्यात विजय उत्तर प्रदेशचा 6 विकेट्सने पराभव करून विजय हजारेचे विजेतेपद पटकावले.