मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचं नाव सध्या चर्चेचा विषय आहे. अर्जुन तेंडुलकरने साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अर्जुनने उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केल्याचं म्हटलं जातं आहे. पण याबाबत दोन्ही कुटुंबापैकी कोणीही अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. यादरम्यान आता अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का बसला आहे.
अर्जुनला २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मोठ्या स्पर्धेतून वगळलं आहे. या स्पर्धेत अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत, पण सचिनच्या लेकाला मात्र डच्चू देण्यात आला आहे. गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा अर्जुन तेंडुलकर दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची आशा बाळगत होता, परंतु नॉर्थ इस्ट झोनच्या संघाने मात्र त्याला धक्का दिला आहे.
रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपमधील चार सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ इस्ट झोन संघात स्थान देण्यात आलेलं नाही. रोंगसेन जोनाथनच्या नेतृत्वाखालील हा संघ २८ ऑगस्ट रोजी सेंट्रल झोनशी भिडणार आहे. अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपच्या चार सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या, या जोरावर गोव्याने प्लेट डिव्हिजनचे विजेतेपद पटकावले.
अर्जुन २०२२-२३ हंगामापासून गोव्याकडून खेळत आहे. या दरम्यान, अर्जुनने गोव्यासाठी संस्मरणीय पदार्पण केले आणि डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३७ विकेट्स आणि ५३२ धावा आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये गोव्यासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुनने १८ सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतल्या आणि १०२ धावा केल्या.
दुलीप ट्रॉफीचे सामने कधी सुरू होणार?
गोवा संघात सामील येण्यापूर्वी त्याने मुंबईसाठी टी-२० मध्ये पदार्पण केले. अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (एमआय) कडूनही खेळला आहे. तो २०२१ पासून मुंबई संघाचा भाग आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये अनुभवी फलंदाज शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड खेळताना दिसणार आहेत.
टीम इंडियाचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुलीप ट्रॉफीमध्ये खेळतील. या स्पर्धेत शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली ऋतुराज गायकवाड वेस्ट झोनच्या संघाकडून खेळेल. इंग्लंडमध्ये फलंदाजीने चमकदार कामगिरी करणारा शुबमन गिल दुलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ झोन संघाचे नेतृत्व करेल.
२८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नॉर्थ झोनचा सामना ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोनविरूद्ध होणार आहे तर नॉर्थ इस्ट झोनचा सामना ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील सेंट्रल झोनविरूद्ध होणार आहे.