उत्तेजक सेवनामुळे टूर-डी-फ्रान्सची सर्व विजेतेपदे गमावणाऱ्या लान्स आर्मस्ट्राँग याने आपल्याविरुद्ध शासनाने दाखल केलेला भ्रष्टाचाराचा खटला मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.
उत्तेजक औषध सेवन केल्यामुळे आर्मस्ट्राँग याच्यावर आंतरराष्ट्रीय सायकलिंग परिषदेने आजीवन बंदी घातली तसेच त्याने कारकिर्दीत टूर-डी-फ्रान्स शर्यतीची मिळविलेली सर्व विजेतेपदे काढून घेण्याचा निर्णय दिला होता. आपण खरा विजेता नसूनही आर्मस्ट्राँगने अमेरिकन पोस्टल सव्‍‌र्हिसची फसवणूक केली व खोटी प्रमाणपत्रे दाखवित ४० दशलक्ष डॉलर्सची कमाई करीत शासनाची फसवणूक केली असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या संदर्भात शासनाने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला आहे.
आर्मस्ट्राँगच्या वकिलाने खटला मागे घेण्याबाबत आर्मस्ट्राँगचा अर्ज येथील न्यायालयात सादर केला आहे. आर्मस्ट्राँगने आपण उत्तेजक औषधे घेतल्याची कबुली तीन वर्षांपूर्वीच दिली आहे. त्याच्यावर घातलेल्या बंदीमुळे त्याचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. त्याने गुन्हा कबूल करूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई अमेरिकन पोस्टल सव्‍‌र्हिसने केलेली नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दाखल केलेला फसवणुकीचा व भ्रष्टाचाराचा खटला मागे घ्यावा असे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.