Asia Cup 2025 Arshdeep Singh Response to Haris Rauf: आशिया चषक २०२५ मधील भारत-पाकिस्तानमधील सुपर फोर सामन्यानंतर पाकिस्तान संघ प्रचंड ट्रोल होत आहे. भारतीय संघाचं उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानचे खेळाडू चाहत्यांच्या रडारवर आले आहेत. पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफने सामन्यादरम्यान हद्द पार केली होती. त्याने सामन्यात विमान पाडण्याचे इशारे केले. यानंतर आता अर्शदीप सिंगने त्याला चांगलचं प्रत्युत्तर दिल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या दोन्ही मोठ्या गोलंदाजांची धुलाई करत उत्कृष्ट फलंदाजी केली. यादरम्यान हारिस रौफ अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलबरोबर मैदानावर भिडतानाही दिसला. त्यानंतर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना त्याने ६-० असा आकडा हाताने दाखवला, याशिवाय त्याने विमान पाडण्याचे हातवारे करतानाही दिसला. त्याच्या या वागण्याला उत्तर म्हणून चाहते मागून विराट कोहली विराट कोहलीचे नारे देत होते.

हारिस रौफ मात्र सातत्याने हे हातवारे करत असल्याचा व्हीडिओ सामन्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर अर्शदीपचा सामन्यानंतरचा मैदानावरील एक व्हीडिओ समोर आला आहे. अर्शदीपला आशिया चषक २०२५ मध्ये युएईविरूद्धचा एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. तर पाकिस्तानविरूद्ध सामन्यातही तो संघाच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता.

हारिस रौफला अर्शदीप सिंगचं प्रत्युत्तराचा व्हीडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने हारिस रौफच्या हातवाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. रौफने भारतीय चाहत्यांकडे ‘६-०’ अशी बोटांची खुण करत मोठं वादंग निर्माण केलं होतं, इतकंच नव्हे तर त्याने लढाऊ विमानं पाडल्याचा इशाराही केला. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला होता, तो साफ खोटा होता. त्यासंबंधित रौफचे हे हातवारे सुरू होते. पण आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अर्शदीपनं पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.

पाकिस्तानच्या या मैदानावरील हातवाऱ्यांना आणि स्लेजिंगला सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी आपल्या फटकेबाजीने उत्तर दिलं. गिल आणि अभिषेकने पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने २३ चेंडूत ४० धावा दिल्या. अभिषेक शर्माने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचे मानसिक खच्चीकरण केलं. परिणामी, टीम इंडियाने १७२ धावांचे लक्ष्य सात चेंडू शिल्लक ठेवत गाठलं.