आयसीसी टी २० विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी आशिया खंडातील क्रिकेट संघांना आपापली क्षमता पडताळून बघण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषकापूर्वी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ ऑगस्टपासून युनायडेट अरब अमिरातीमध्ये (यूएई) आशिया चषक खेळवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघासोबतच प्रसारकांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.

आशिया चषकासाठी स्टार स्पोर्ट्स नेटकवर्क आणि हॉटस्टार सामन्यांचे प्रसारण करणार आहे. त्यासाठी स्टार स्पोर्ट्सने थीम साँग तयार केले आहे. त्याचा व्हिडीओ स्टारने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतासह इतर सर्व संघांना स्थान देण्यात आले आहे. “नंबर वन मेरा इंडिया अब जीतेगा एशिया, पडोसियों में भी जागी है जीत की उमंग”, असे या गाण्याचे बोल आहेत. क्रिकेट चाहत्यांना हे जोशपूर्ण गाणे आवडल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर काही वेळातच त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

ही स्पर्धा श्रीलंका येथे खेळवली जाणार होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून तिथे राजकीय तसेच आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी येथील नागरिक प्रचंड संतापलेले आहेत. त्यामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेत खेळवणे योग्य होणार नाही, असा बीसीसीआयचा विचार आहे. याच कारणामुळे ही स्पर्धा आता श्रीलंका ऐवजी यूएई येथे खेळवली जाणार आहे.

हेही वाचा – CWG 2022 : स्मृतीला करायची आहे नीरज चोप्रासारखी कामगिरी; राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास

अलीकडच्या काळाचा विचार केला तर भारतीय संघाने २०१६ आणि २०१८ मध्ये आशिया चषक जिंकलेला आहे. यावर्षीचा आशिया चषक भारतासाठी अधिक महत्वाचा असणार आहे. भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीला देखील आशिया स्पर्धेत फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे. या स्पर्धेत खेळाडूंची कामगिरी बघून टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होण्याची दाट शक्यता आहे.