Asia Cup 2022 IND vs HG: सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या हे दोन फलंदाज असे आहेत जे स्टंपच्या मागे फटके मारून धावा लुटण्यासाठी ओळखले जातात. सर्वसाधारण पणे आक्रमक फलंदाज मिड विकेट, लाँग ऑन व गोलंदाजाच्या डोक्यावरून म्हणजे सरळ किंवा पुलसारखे फटके जास्त मारून धावा लुटतात. हे दोघेही फ्रंट फुटला न खेळता पिचमध्ये मागे म्हणजे स्टंपच्या जवळ उभे राहतात. चेंडू जसा पडेल त्याप्रमाणे पवित्रा घेत स्क्वेअर लेग ते गली या भागात ते मनगटाचा प्रामुख्याने वापर करत बॉल मारतात. सहसा या भागामध्ये फिल्डर जवळ असल्याने चौकार षटकार मिळवणे सोपे जाते. पण यासाठी तितकंच कसब आवश्यक आहे. आपल्याला हे शॉट्स खेळणं कसं जमतं यावर एका मुलाखतीमध्ये सूर्यकुमारने स्वतःच कारण सांगितलंय…

कालच्या सामन्यात सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर स्विपचा फटका खेळताना स्क्वेअर लेगला चौकार मारला. हाँगकाँगच्या कर्णधारने मग तिथं सीमेवर क्षेत्ररक्षक ठेवला. तर पुढच्याच चेंडुवर सूर्याने स्विपचाच फटका मारला पण तो इतक्या कुशलतेने मारला की चेंडू सर्कलच्या आत असलेल्या फाइन लेगच्या डोक्यावरून चौकार गेला. फास्ट बॉलरचा एक चेंडू तर सूर्याने स्कूप करत विकेट किपरच्या डोक्यावरून मारत सहा धावा मिळवल्या. स्टंपच्या मागे अशा पद्धतीने धावा काढण्याचं कसब असलेला सूर्यकुमार जेव्हा स्थिरावतो त्यावेळी समोरच्या संघाकडे हतबल होण्याखेरीज पर्याय राहत नाही.

(सूर्यकुमारची स्फोटक खेळी पाहून विराट कोहली अवाक, मैदानावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर सूर्यकुमार म्हणतो की,लहानपणी सिमेंटच्या पिचवर रबरी बॉलने खेळताना समोरची बाऊंड्री मोठी असायची आणि मागची बाऊंड्री लहान असायची… त्यामुळे मागे शॉट मारायची सवय लागली आहे. आपल्यापैकी अनेकांनी क्रिकेटपटू व्हायची स्वप्न असाच सिमेंटच्या मैदानात पाहिली असतील त्यामुळे सूर्यकुमारचं हे स्पष्टीकरण तुम्हालाही आपलंस वाटलं असेल, हो ना?

दरम्यान, आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात हाँगकाँगवर ४० धावांनी मात केली. सलग दुसऱ्या विजयासह भारताने ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश मिळवला आहे.