दुबई : मध्यल्या फळीत संजू सॅमसनला येत असलेल्या अपयशामुळे चिंतेत असलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय संघ व्यवस्थापन आज, शुक्रवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल चार’ फेरीतील अखेरच्या लढतीत जितेश शर्माला संधी देण्याबाबत विचार करू शकतील.

भारतीय संघाने अंतिम फेरीतील स्थान आधीच निश्चित केले असून श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, जेतेपदाच्या लढतीपूर्वी राखीव खेळाडूंना संधी देण्याबाबत भारतीय संघ विचार करू शकेल. सॅमसनसाठी योग्य फलंदाजी क्रमांक कोणता, हा मोठा प्रश्न भारतासमोर निर्माण झाला आहे.

या स्पर्धेपूर्वी सलामीला खेळणाऱ्या सॅमसनला शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे आता मधल्या फळीत खेळावे लागते आहे. मात्र, ओमानविरुद्धचे अर्धशतक वगळता त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. बांगलादेशविरुद्ध बुधवारी झालेल्या लढतीत पाच गडी गमावूनही सॅमसनला फलंदाजीला पाठविण्यात आले नाही.

शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना त्याच्याआधी संधी मिळाली. त्यामुळे आता सॅमसनच्या जागी विजयवीराची भूमिका बजाविण्यात सक्षम असलेल्या जितेश शर्माला खेळवले जाऊ शकेल. जितेशने ‘आयपीएल’मध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना १८ डावांत ३७४ धावा, तर सहाव्या क्रमांकावर १५ डावांत ३८४ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला खेळवणे भारताला फायदेशीर ठरू शकेल.

भारतासाठी क्षेत्ररक्षण हासुद्धा चिंतेचा विषय ठरत आहे. भारतीय संघाने पाच सामन्यांत मिळून दहा झेल सोडले आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षणात मोठी सुधारणा आवश्यक आहे. तसेच या लढतीत जसप्रीत बुमराला विश्रांती देत हर्षित राणाला संधी मिळू शकेल.

वेळ : रात्री ८ वा. थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १,३.