Team India Record: आशिया चषकात शुक्रवारी (१९ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात भारतीय संघ भारत आणि ओमान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे. हा भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २५० वा सामना ठरला. यासह भारतीय संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० सामने खेळणारा दुसरा संघ ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७५ सामने खेळणारा पाकिस्तानचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे.

टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० सामने खेळण्याचा विक्रम हा आधी पाकिस्तानच्या नावावर होता. या क्लबमध्ये आता भारतीय संघाने एन्ट्री केली आहे. २३५ सामन्यांसह न्यूझीलंडचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. २२८ टी-२० आंतरराष्ट्रीय खेळणारा वेस्टइंडिजचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर २१२ सामने खेळणारा श्रीलंकेचा संघ या यादीत पाचव्या स्थानी आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ:

पाकिस्तान- २७५ सामने
भारतीय संघ- २५० सामने
न्यूझीलंड- २३५ सामने
वेस्टइंडिज- २२८ सामने
श्रीलंका- २१२ सामने

भारतीय संघाने उभारला १८८ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतेला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १८८ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्माने ३८ धावांची खेळी केली. तर शुबमन गिल अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. संजू सॅमसनने मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन ५६ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्या १ धाव करून माघारी परतला. अक्षर पटेलने २६ धावा केल्या.

तर तिलक वर्माने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १८८ धावा केल्या. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ज्या फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्या फलंदाजांना या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. मुख्य बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात फलंदाजीला आलाच नाही. त्याने सर्वांना फलंदाजीची संधी दिली.