Asia Cup 2025 Trophy Controversy: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आणि अंतिम सामना आपल्या नावावर केला. पण अंतिम सामना जिंकूनही भारतीय संघाला जेतेपदाची ट्रॉफी दिली गेली नव्हती. ही ट्रॉफी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते दिली जाणार होती. पण भारतीय खेळाडूंना नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नक्वी तिथून ट्रॉफी घेऊन निघून गेले. आता भारताला ट्रॉफी न देण्याची भूमिका घेतल्यामुळे मोहसीन नक्वींना गोल्ड मेडल दिलं जाणार आहे.

अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंना ट्रॉफी द्यायला हवी होती. पण भारतीय खेळाडूंनी नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्याला विरोध केला. त्यामुळे ट्रॉफी घेऊन निघून गेले. भारतीय खेळाडूंना जल्लोष साजरा करण्याची देखील संधी मिळाली नव्हती. भारतीय खेळाडूंना ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन करावं लागलं.

आशिया चषकाचा अंतिम सामना होऊन ५ दिवस उलटून गेले आहेत. अद्यापही भारतीय खेळाडूंना जेतेपदाची ट्रॉफी दिली गेलेली नाही. मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. आता बीसीसीआय मोहसीन नक्वी यांची आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याच्या विचारात आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी मोहसीन नक्वींनी केलेल्या कृत्याचा कडाडून विरोधही केला होता.

मोहसीन नक्वींना गोल्ड मेडलं दिलं जाणार

द नेशनच्या वृत्तानुसार, आशिया चषकाची ट्रॉफी पळविणाऱ्या मोहसीन नक्वींचा पाकिस्तानात मोठा सन्मान केला जाणार आहे. त्यांना कराचीमध्ये शहीद झुल्फिकार अली भुट्टो एक्सलन्स गोल्ड मेडल दिलं जाणार आहे. भारतीयांनी केलेल्या मागण्यांविरोधात खंबीरपणे उभं राहिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा पुरस्कार कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष वकील गुलाम अब्बास जमाल यांनी जाहीर केला असल्याचं वृत्त आहे.