Asia Cup 2025 IND vs OMAN Match: भारत आणि ओमान यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. भारताने संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर ९ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या. ओमानची गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाविरूद्ध ९ विकेट्स घेण्यात यश मिळवलं. पण भारताच्या फलंदाजीदरम्यान संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाने सगळेच चकित झाले.

कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुपर फोरमध्ये आधीच धडक मारलेल्या भारतीय संघासाठी हा सामना सरावाप्रमाणेच होता. भारताने यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी न केल्याने या सामन्यात नाणेफेक जिंकताच फलंदाजीचा निर्णय घेतल्याचं सूर्याने सांगितलं.

भारतीय संघाकडून सलामीसाठी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलची जोडी उतरली. पण यानंतर मात्र भारताच्या फलंदाजांच्या क्रमात मोठा बदल पाहायला मिळाला. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर तर हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आले. तर अक्षर पटेल पाचव्या व शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आले, तर तिलक वर्मा थेट सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

ओमानविरूद्ध सामन्यात सर्वात चकित करणारा निर्णय ठरला तो म्हणजे संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं फलंदाजीला उतरला नाही. तिलक-शिवमची जोडी बाद झाल्यानंतरही हर्षित राणा, अर्शदीप सिंग कुलदीप यादव फलंदाजीला आले, पण फलंदाजीला जाण्यासाठी तयार राहिलेला सूर्या ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला जाण्यासाठी तयार होता. पण तोपर्यंत २० षटकं मात्र संपली आणि कर्णधार फलंदाजीला आला नाही. यावरून मीम्सचा पूर सोशल मीडियावर आलेला पाहायला मिळत आहे.

सूर्यकुमार यादव ओमानविरूद्ध फलंदाजीला का उतरला नाही?

सूर्यकुमार यादवला कोणतीही दुखापत झालेली दिसली नाही आणि नाणेफेकीवेळी तो पूर्णपणे फिट दिसत होता. त्यामुळे इतर खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळावी म्हणूनच हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. या सामन्यापूर्वी, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांव्यतिरिक्त सूर्यकुमारच एकमेव खेळाडू होता, ज्याने दोन्ही सामन्यांत फलंदाजी केली होती. जर सूर्यकुमार यादवने या सामन्यात फलंदाजी केली असती तर भारताच्या धावसंख्येने २००चा आकडा गाठला असता.