पीटीआय, कोलंबो : पाच वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ उत्सुक असून त्याकरिता आज, रविवारी होणाऱ्या आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यांना श्रीलंकेचे आव्हान परतवावे लागेल. या लढतीत भारताला रोहित आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. भारताचा आठव्यांदा, तर श्रीलंकेचा सातव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न आहे.

अंतिम लढतीपूर्वी दोन्ही संघांना दुखापतींचा सामना करावा लागला आहे. डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलच्या हात आणि पायाला झालेल्या दुखापतीची भारतीय संघाला चिंता आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेला आणखी मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा प्रमुख फिरकीपटू महीश थीकसाना पायाला झालेल्या दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकणार आहे. त्याची उणीव श्रीलंकेला निश्चित जाणवेल.

Ali's Challenge for Three Sixes in a straight
Babar Azam : ‘जर बाबरने टी-विश्वचषकात समोर सलग ३ षटकार मारले तर…’, माजी क्रिकेटपटूने कर्णधाराला दिलं खुलं आव्हान
rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत
mohsin nakki
लाहोर, कराची, रावळपिंडीला पसंती; चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम
Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य

भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८च्या आशिया चषकाचे जेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी, तर २०२१ आणि २०२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भारताने एकही स्पर्धा जिंकलेली नाही. आता आशिया चषक जिंकून जेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याची आणि आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आत्मविश्वास उंचावण्याची भारताला नामी संधी आहे.

गेल्या आशिया चषकात भारताने निराशाजनक कामगिरी केली होती. ट्वेन्टी-२० प्रारूपात झालेल्या या स्पर्धेत श्रीलंकेचा संघ विजयी ठरला होता. त्यामुळे श्रीलंकेचे आता घरच्या मैदानावर खेळताना जेतेपद आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न असेल. मात्र, भारताला नमवण्यासाठी त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघाने यंदाच्या आशिया चषकात चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताने नेपाळचा पराभव करत ‘सुपर फोर’ फेरी गाठली. या फेरीतील पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत भारताने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या ‘सुपर फोर’ फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाला; परंतु भारताने या सामन्यासाठी विराट कोहली, हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरासह पाच प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे अंतिम लढतीसाठी ते ताजेतवाने होऊन मैदानात उतरतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

कोहली विरुद्ध वेल्लालागे द्वंद्वावर नजर

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आशिया चषकाच्या ‘सुपर फोर’ फेरीत पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. मात्र, श्रीलंकेविरुद्ध तो केवळ तीन धावा करू शकला होता. त्याला डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने बाद केले होते. कोहलीला यापूर्वीही डावखुऱ्या फिरकीपटूंनी अडचणीत टाकले आहे. २०२१ पासून कोहलीला २८ पैकी आठ एकदिवसीय सामन्यांत डावखुऱ्या फिरकीपटूने बाद केले आहे आणि या गोलंदाजांविरुद्ध त्याने केवळ १३च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम लढतीत कोहली वेल्लालागेविरुद्ध कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बुमरा, कुलदीपकडे लक्ष

भारताच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने रोहित, कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यावर असेल. यापैकी कोहली, गिल आणि राहुल यांनी या स्पर्धेत एकेक शतक साकारले आहे. रोहितने पाचपैकी तीन सामन्यांत अर्धशतके केली असली, तरी त्याचा आणखी मोठी खेळी करण्याचा मानस असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. कुलदीपने गेल्या दोन सामन्यांत मिळून नऊ बळी मिळवले आहेत. तर वर्षभराहूनही अधिक कालावधीनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन केलेल्या बुमरालाही सूर गवसला आहे.

मेंडिस, असलंकावर भिस्त

यंदाच्या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होईल असे भाकीत क्रिकेट जाणकारांकडून करण्यात येत होते. मात्र, ‘सुपर फोर’ फेरीच्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता भारतालाही पराभवाचा धक्का देण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल. फलंदाजीत श्रीलंकेची भिस्त कुसाल मेंडिस, चरिथ असलंका आणि धनंजय डिसिल्वा यांच्यावर असेल. गोलंदाजीत भारताविरुद्ध गेल्या सामन्यात पाच बळी मिळवणाऱ्या दुनिथ वेल्लालागेवर सर्वाच्या नजरा असतील.

पावसाची शक्यता

कोलंबो येथे रविवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तान-श्रीलंका सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे सामना ४२-४२ षटकांचा करण्यात आला. शुक्रवारी मात्र भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान जराही पाऊस झाला नाही. रविवारीही अशीच स्थिती राहील अशी चाहत्यांना आशा असेल. या सामन्यासाठी सोमवार हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

वॉशिंग्टन सुंदरचा समावेश

कोलंबो : डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलला झालेल्या दुखापतींमुळे अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा आशिया चषकाच्या अंतिम लढतीसाठी भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध ‘सुपर फोर’ फेरीच्या अखेरच्या सामन्यात फलंदाजीदरम्यान अक्षरच्या हाताला दुखापत झाली. तसेच त्याने पायाला दुखापत झाल्याचीही तक्रार केली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता असल्याने वॉशिंग्टनला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. वॉशिंग्टन ऑफ-स्पिन गोलंदाजी करत असून डावखुरा फलंदाज आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६ सामन्यांत १६ गडी बाद केले आहेत. तसेच एका अर्धशतकासह २३३ धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचाही भाग आहे.

  • वेळ : दुपारी ३ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप