आयपीएल २०२४ मधील ६३वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, मात्र पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही आणि सामना रद्द करण्यात आला. हा सामना रद्द झाल्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर पडला आहे. याशिवाय, हा सामना रद्द झाल्याचा फायदा अनेक संघांना झाला आहे.गुजरात टायटन्ससाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते, तर केकेआर संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सराव सामना होता पण तरीही केकेआरला हा सामना रद्द झाल्याचा तगडा फायदा झाला आहे.
IPL 2024 च्या प्लेऑफसाठी फक्त तीन जागा उरल्या आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर केकेआर आणि गुजरात टायटन्सला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यानंतर गुजरात संघाचे १३ सामन्यांत ११ गुण आहेत आणि जर त्यांनी त्यांचे उर्वरित सामने जिंकले तर ते जास्तीत जास्त १३ गुणांपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे जीटीचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला. गुजरात टायटन्स हा IPL 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ आधीच आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते.
अहमदाबादमधील हा सामना रद्द झाल्याने सात संघांना फायदा झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला प्ले ऑफमध्ये पोहोचला असला तरी मोठा फायदा झाला आहे. सामना रद्द झाल्यामुळे, त्यांना एक गुण देखील मिळाला, ज्यामुळे संघाने १३ सामन्यांमध्ये ९ विजय, ३ पराभव आणि एक सामना रद्द झाल्याने १९ गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत कोणताही संघ त्यांना टॉप २ मधून बाहेर काढू शकणार नाही आणि KKR संघाला आयपीएल फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतील.
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
गुजरात-कोलकाताचा सामना रद्द झाल्याचा फायदा KKR व्यतिरिक्त प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या सर्व संघांना झाला आहे. त्यांच्या शर्यतीत एक संघ कमी संघांचा मार्ग आता थोडा मोकळा झाला आहे. आता ६ संघांमध्ये तीन जागांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरी, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या नावांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त उर्वरित ४ संघांनी १३ सामने खेळले आहेत.
हेही वाचा – ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
चेन्नईच्या खात्यात १३ सामन्यांत १४ गुण, आऱसीबीकडे १३ सामन्यांत १२ गुण, दिल्ली कॅपिटल्सचे १३ सामन्यांनंतर १२ गुण आहेत. तर राजस्थानचे १२ सामन्यांनंतर १६ गुण आहेत, हैदराबादचे १२ सामन्यांत १४ गुण आणि लखनऊ चे १२ सामन्यांत १२ गुण आहेत. या तिन्ही संघांना अजून संधी आहेत. खरा धोका सीएसके, आरसीबी आणि दिल्लीवर आहे कारण त्यांचा फक्त एक सामना शिल्लक आहे. CSK आणि RCB स्वतः आमनेसामने येणार आहेत. तर मंगळवारी दिल्लीचा सामना लखनऊशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ पराभूत झाला तर प्लेऑफमधून बाहेर जाईल. आता लीगमध्ये फक्त ७ सामने बाकी आहेत.