पीटीआय, कोलंबो
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत १० सप्टेंबरला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यातील सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मात्र, या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) केवळ या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संघ द्विदेशीय मालिका खेळत नाहीत. हे संघ केवळ आंतरखंडीय आणि ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धात आमनेसामने येत असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व असते. दोन्ही देशांतील चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, आशिया चषकाच्या साखळी फेरीतील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे पूर्ण होऊ न शकल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आता अशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये यासाठी ‘एसीसी’ने या दोन देशांतील ‘सुपर फोर’ फेरीतील सामन्यासाठी विशेष राखीव दिवसाचा घाट घातला आहे. भारत-पाकिस्तान सामना रविवार, १० सप्टेंबरला होणार आहे. मात्र, पावसामुळे या दिवशी सामना पूर्ण न झाल्यास, उर्वरित सामना पुढील दिवशी म्हणजेच सोमवार ,११ सप्टेंबरला खेळवला जाईल.
हेही वाचा >>>प्रो कबड्डी लीगचा खेळाडू लिलाव ऑक्टोबरमध्ये
‘‘कोलंबोच्या आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘सुपर फोर’ फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. प्रतिकूल हवामानामुळे भारत-पाकिस्तान सामना मध्येच थांबवावा लागल्यास, ११ सप्टेंबरला उर्वरित सामना खेळवला जाईल,’’ असे ‘एसीसी’ने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
आशिया चषकाचा अंतिम सामना
१७ सप्टेंबरला खेळवण्यात येणार असून यासाठी राखीव दिवसाची आधीच घोषणा करण्यात आली होती. कोलंबो येथे हवामानात सुधारणा अपेक्षित असली, तरी कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आशिया चषकाच्या ‘सुपर फोर’ फेरीतील उर्वरित सर्व सामने, तसेच अंतिम सामना कोलंबो येथेच खेळवण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांना आपल्या मूळ तिकिटावर राखीव दिवशीही स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल, असे ‘एसीसी’ने स्पष्ट केले आहे.
केंद्रबदल न करण्यामागे खरे कारण काय? – गावस्कर
कोलंबोत पावसाची शक्यता असतानाही आशिया चषकाचे ‘सुपर फोर’ फेरीतील सामने तेथून हंबन्टोटा येथे हलविण्याचा निर्णय घेतला गेला नाही, यामागचे खरे कारण काय? असा सवाल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. ‘‘केंद्रबदल न करण्यामागे खरे कारण काय होते हे कोणीतरी शोधून काढले पाहिजे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहायचे तर खेळाडूंचा हंबन्टोटा येथे खेळण्यास विरोध होता असे दिसते. कोलंबोतील हवामान लक्षात घेता आयोजकांची हंबन्टोटा येथे सामने खेळवण्याची बहुधा तयारी होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांना हा निर्णय बदलावा लागला,’’ असे गावस्कर म्हणाले. तसेच कोणत्याही एका देशाच्या खेळाडूंचा केंद्रबदलास विरोध होता असे आपले म्हणणे नाही हे गावस्कर यांनी स्पष्ट केले.